परंडा: प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना परंडा शहरात घडली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत, गाडीला कट का मारला याचा जाब विचारल्याने दुचाकीस्वाराला दगडाने मारहाण करण्यात आली. या दोन वेगवेगळ्या घटनांनी परंडा शहर हादरले असून, याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटना १: डोक्याला लावले पिस्तूल (कुर्डूवाडी रोड)
परंडा शहरातील कुर्डूवाडी रोडवर असलेल्या हॉटेल जाधवमध्ये ही थरारक घटना घडली. फिर्यादी मयुर बापु वाघमारे (वय २८, रा. माळी गल्ली, परंडा) हे हॉटेलमध्ये असताना, आरोपी राहुल माने (२२, रा. भीमनगर) आणि व्यंकटेश सांगळे (१९, रा. सोनारी) तिथे आले.
आरोपींनी मयुर यांना, “भीमनगर येथील मुलीसोबत तुझे प्रेमसंबंध आहेत,” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपी राहुल माने याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आपल्याकडील पिस्तूल मयुर यांच्या डोक्याला लावली. याप्रकरणी परंडा पोलिसांनी आर्म ॲक्ट आणि भा.न्या.सं. कलम १०९ (जिवे मारण्याचा प्रयत्न) सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटना २: ‘कट’ मारल्याचा जाब विचारला म्हणून मारहाण (खासगाव शिवार)
दुसरी घटना खासगाव शिवारातील चौधरी हॉटेलसमोर घडली. फिर्यादी ताहेर युसुफ मुजावर (३७, रा. मंगळवार पेठ, परंडा) हे आपल्या मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी आरोपी रोहीत रामा कडबने (रा. परंडा), जयराम खरात व इतर दोन साथीदारांनी त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट गाडी भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या दुचाकीला कट मारला.
ताहेर मुजावर यांनी याचा जाब विचारला असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच, “तू जर आमच्यावर केस केली तर तुला जिवे ठार मारू,” अशी धमकी दिली. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही घटनांचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.






