धाराशिव : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या आणि तुळजापूरसह धाराशिव जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित ‘तुळजापूर एमडी ड्रग्ज’ प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. गेल्या १० महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी अतुल श्याम अग्रवाल याला तामलवाडी पोलिसांनी मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरातून शिताफीने अटक केली आहे.
लॉन्ड्रीच्या दुकानातून चालवायचा ड्रग्जचे रॅकेट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अतुल अग्रवाल हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असून, गेल्या २० वर्षांपासून तो मुंबईत स्थायिक होता. मीरा-भाईंदर परिसरात एका लॉन्ड्रीच्या दुकानाच्या आडून तो हा ड्रग्जचा काळाबाजार चालवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, २०१४ मध्येही त्याच्यावर मुंबईत ड्रग्ज प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, यावरून तो सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होते.
प्रकरणाची व्याप्ती आणि गुन्हेगारांची साखळी
तामलवाडी पोलीस ठाण्यात १४ फेब्रुवारी २०२५ रोजी या ड्रग्ज रॅकेट संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ३९ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यातील सद्यस्थिती खालीलप्रमाणे:
-
एकूण आरोपी: ३९
-
अटक व जामीन: २७ आरोपींना अटक होऊन जामीन मिळाला आहे.
-
जेलमध्ये: ३ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत (जेलमध्ये) आहेत.
-
अटकपूर्व जामीन: ६ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
-
फरार: ३ आरोपी फरार होते, त्यापैकी मुख्य सूत्रधार अग्रवाल याला आता अटक झाली आहे.
- फरार – वैभव गोळे ( मुंबई ), मिठू उर्फ इंद्रजित ठाकूर ( नळदुर्ग )
निवडणुकीनंतर अटकेमुळे राजकीय चर्चांना उधाण
तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरण हे केवळ गुन्हेगारी जगतापुरते मर्यादित न राहता, स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणातही गाजले होते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत या ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. ड्रग्जचा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी असताना मुख्य आरोपी फरार होता. मात्र, आता निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्यामुळे, “ही कारवाई निवडणुकीपूर्वी का झाली नाही?” असा सवाल उपस्थित केला जात असून राजकीय वर्तुळात या अटकेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अग्रवालच्या अटकेमुळे या ड्रग्ज रॅकेटमधील आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






