धाराशिव: प्रेमाच्या जाळ्यात ओढून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे वय १९ वर्षे असल्याचे भासवण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करून तिचा बालविवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये उघडकीस आली आहे. यानंतर सदर तरूणाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार घडला. दिनांक २१ जानेवारी २०२५ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत संशयित तरुणाने पीडित मुलीशी (वय १६ वर्षे ९ महिने) प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नासाठी मुलीचे वय कमी असल्याने त्याने कट रचला. त्याने मुलीचे बनावट आधारकार्ड तयार करून त्यावर तिचे वय १९ वर्षे असल्याचे दाखवले.
आरोपीने हे बनावट कागदपत्र दाखवून पीडित मुलगी आणि तिच्या आईला लग्नासाठी भाग पाडले आणि तिचा बालविवाह केला. लग्नानंतर आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. आपली फसवणूक झाल्याचे आणि मुलीवर अत्याचार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने २८ डिसेंबर रोजी पोलिसांत धाव घेतली.
पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(एफ), ६४(२)(एम) (बलात्कार), ३४०(२) (बनावट कागदपत्र), ३३६(३) तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ७, १० आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO) कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.






