धाराशिव : लोहारा तालुक्यातील खेड येथे जलजीवन मिशन आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संतप्त गावकऱ्यांनी आज थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ‘बोंबाबोंब’ आंदोलन केले. दीड कोटी रुपयांच्या या कथित घोटाळ्यात कारवाईसाठी वर्षभर उंबरठे झिजवूनही दाद न मिळाल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर झाला होता. अखेर प्रशासनाने चौकशी समिती नेमून स्थळ पाहणीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
नेमके प्रकरण काय?
लोहारा तालुक्यातील खेड येथे जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. ग्रामसेवक, अभियंता आणि गट विकास अधिकारी यांनी संगनमत करून कामे न करताच किंवा निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाची फसवणूक केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
-
सार्वजनिक शौचालय व नळ शिफ्टिंग: शौचालयासाठी ७ लाख व नळ कनेक्शनसाठी ४.५० लाख मंजूर झाले, मात्र काम न करताच बोगस एमबी (MB) तयार करून बिले उचलण्यात आली.
-
शाळेचे कंपाउंड: वॉल कंपाउंडचा ठराव असताना अभियंत्यांनी फक्त तारेचे कुंपण केले. यासाठी १.७५ लाखांचा निधी खर्ची पडला, तरीही काम अत्यंत निकृष्ट आहे.
-
पाण्याची टाकी व पाईपलाईन: बांधलेल्या पाण्याच्या टाकीला भेगा पडल्या असून ती कोसळण्याची भीती आहे. पाईपलाईनसाठी फक्त खोदाई केली, पण पाईप टाकलेच नाहीत.
-
महिला केंद्र: सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावात महिला केंद्राची इमारत अस्तित्वात नसतानाही, ती बांधल्याचे दाखवून त्याचे बिल उचलण्यात आले आहे.
प्रशासनाची धावपळ आणि आश्वासन
गेल्या वर्षभरापासून समाजसेवक अण्णाराव कांबळे आणि गावकरी कारवाईसाठी पाठपुरावा करत होते. मात्र, प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने आज आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांच्या दालनासमोरच ठिय्या देत दोन तास बोंबाबोंब आंदोलन केले. यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांच्या अध्यक्षतेखालील समिती खेड येथे जाऊन प्रत्यक्ष कामांची आणि दर्जाची पाहणी करेल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात अण्णाराव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य जया कांबळे, सीमा गायकवाड, सुदर्शन गव्हाळे, शिवा गायकवाड, दिलीप कांबळे, बालाजी कांबळे, गौतम गायकवाड, बळीराम बनसोडे, पप्पू गायकवाड, सुरज कांबळे, अण्णा कांबळे व बाळू सुरवसे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.






