नळदुर्ग (ता. तुळजापूर): तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर (नळदुर्ग) येथील जागृत देवस्थान श्री खंडोबाची वार्षिक महायात्रा येत्या २, ३ आणि ४ जानेवारी रोजी साजरी होणार आहे. यात्रेसाठी राज्यभरातून किमान पाच लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, मंगळवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या बैठकीत यात्रेच्या सुरळीत नियोजनासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.


वाहतुकीत बदल आणि सुविधा:
-
रस्ता बंद: २ ते ४ जानेवारी या कालावधीत खंडोबा मंदिर परिसरातील चारपदरी मार्ग जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
-
वाहतूक वळविली: या कालावधीत सर्व जड वाहने जुन्या रस्त्याने, म्हणजेच नळदुर्ग शहरातून वळवण्यात येतील.
-
भाविकांच्या सोयीसाठी एसटी बसची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रेतील प्रमुख निर्बंध:
यात्रेचे पावित्र्य आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत:
१. यात्रेतील सर्व प्रकारचे अवैध धंदे ( चक्री जुगार ) पूर्णपणे बंद राहतील.
२. यात्रा काळात परिसरात मांस आणि मच्छी विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.
३. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डुप्लिकेट हळद (केमिकल युक्त पिवळा रंग) विक्रीस सक्त मनाई करण्यात आली आहे.
मान्यवरांची उपस्थिती:
शांतता समितीच्या बैठकीला नळदुर्ग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बसवराजअप्पा धरणे आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव प्रमुख उपस्थित होते.
तसेच श्री खंडोबा देवस्थान समितीचे अविनाश मोकाशे, दीपक मोकाशे, शशिकांत मोकाशे, अमोल मोकाशे, महादेव मोकाशे आणि अणदूर यात्रा कमिटीचे अध्यक्ष मनोज मुळे, धनराज चव्हाण, कल्याणी मुळे, धनराज मुळे, प्रवीण घोडके, गुरुनाथ मिटकरी, म्हाळाप्पा गळाकाटे यांच्यासह सर्व मानकरी व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






