धाराशिव: राजकीय विरोधाला आता कौटुंबिक आणि वैयक्तिक टीकेची किनार लागली असून, धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा भाषेची पातळी खालावल्याचे पाहायला मिळाले आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एकेरी उल्लेख करत अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “ओम्या, शेमडं पोरं.. तुझी औकात काय?” असे म्हणत मल्हार पाटील यांची जीभ घसरली आहे.
तुळजापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद (पिटू ) गंगणे यांच्या पदग्रहण सोहळ्यानंतर सायंकाळी आयोजित एका भव्य सत्कार समारंभात मल्हार पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली.
काय म्हणाले मल्हार पाटील?
भाषणादरम्यान मल्हार पाटील यांचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला. ते म्हणाले, “ओम्या, शेमडं पोरं.. तुझी औकात काय? दिल्लीत जाऊन काय दिवे लावले हे लोकांना माहिती आहे. जनतेसाठी पुढच्या ५० पिढ्या आम्हीच असणार आहोत.” तसेच, “तुळजाभवानी मातेची बदनामी करणे हा यांच्या प्रचाराचा मुद्दा होता, मात्र आई भवानीने तो पुसून काढला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
‘राक्षसी आनंद’ आणि ‘ओपन चॅलेंज’
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ देत मल्हार पाटील म्हणाले की, “सहानुभूतीच्या लाटेवर आणि एका विशिष्ट समाजाच्या मतांवर माझ्या माऊलीला पराभूत केल्याचा अतिशय ‘राक्षसी’ आनंद या खासदाराला झाला होता. मात्र, त्या आनंदाला आता जनतेनेच उत्तर दिले असून, त्यांची खरी औकात मायबाप जनतेने दाखवून दिली आहे.”
यावेळी त्यांनी ओमराजेंना खुले आव्हानही दिले. “धमक असेल तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकून दाखवा, मल्हार पाटील नाव बदलतो,” असे ओपन चॅलेंज त्यांनी दिले.
काका-पुतण्यातील संघर्ष पेटला
विशेष म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर हे नात्याने मल्हार पाटील यांचे चुलत चुलते लागतात. मात्र, राजकारणात हे नाते बाजूला सारून टीकांची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पराभवानंतर मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर हा हल्लाबोल केला आहे. दरम्यान, या टीकेवर आणि एकेरी उल्लेखावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.






