धाराशिव: म्हणतात ना, राजकारणात काहीही परमनंट नसतं, पण धाराशिवमध्ये मात्र दोन गोष्टी परमनंट आहेत- एक म्हणजे जिल्ह्याचे मागासलेपण आणि दुसरं म्हणजे ‘पाटील विरुद्ध निंबाळकर‘ हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला रक्तरंजित संघर्ष!
गेली ४५ वर्षे डॉ. पदमसिंह पाटील आणि त्यानंतर त्यांचे सुपुत्र राणाजगजीतसिंह पाटील यांची सत्ता या जिल्ह्याने अनुभवली. पण आता या ‘पावर गेम’मध्ये तिसऱ्या पिढीची एंट्री झाली आहे. राणादादानंतर त्यांचे सुपुत्र मल्हार पाटील सध्या राजकीय आखाड्यात शड्डू ठोकून उभे आहेत. पण प्रश्न असा आहे की, ही आक्रमकता आहे की सत्तेचा ‘माज ‘?
राडा ‘काका-पुतण्या’चा आणि वारसा ‘वैरत्वा’चा!
इतिहास रक्ताने लिहिला गेलाय. एकेकाळी डॉ. पदमसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे चुलत भाऊ सत्तेत एकत्र होते. पण २००४ मध्ये पवनराजेंची हत्या झाली आणि हे घरं फुटलं. पवनराजेंचा मुलगा ओमराजे निंबाळकर यांनी ‘फायरब्रँड’ नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी पाटील घराण्याच्या सत्तेला सुरुंग लावला. नुकत्याच झालेल्या लोकसभेत ओमराजेंनी राणादादांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा तब्बल सव्वा तीन लाखांनी पराभव केला.
हा पराभव पाटील घराण्याच्या जिव्हारी लागला असणारच. वडील राणाजगजीतसिंह पाटील हे स्वभावाने मवाळ आणि मोजके बोलणारे. पण त्यांचा मुलगा मल्हार मात्र आता ‘अँग्री यंग मॅन’च्या भूमिकेत दिसतोय.
“ओम्या, शेमडं पोरं…” – मल्हाररावांचा तोल सुटला!


नुकत्याच ८ नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. यात भाजपला यश मिळालं आणि ठाकरे गटाला धक्का बसला. याच विजयाचा ‘हँगओव्हर’ कदाचित मल्हार पाटलांच्या डोक्यात गेला असावा. तुळजापुरात बोलताना मल्हाररावांची जीभ चांगलीच घसरली. समोर खासदार ओमराजे निंबाळकर (जे नात्याने त्यांचे चुलत चुलते लागतात) असतानाही, मल्हाररावांनी थेट एकेरी उल्लेख करत पातळी सोडून टीका केली.
“ओम्या, शेमडं पोरं… तुझी औकात काय? दिल्लीत जाऊन काय दिवे लावले हे लोकांना माहिती आहे.”
एवढ्यावरच न थांबता, “जनतेसाठी पुढच्या ५० पिढ्या आम्हीच असणार आहोत,” असा अतिआत्मविश्वासही त्यांनी दाखवून दिला. लोकसभेत आईचा पराभव झाल्याचा वचपा काढण्यासाठी मल्हाररावांनी थेट ‘ओपन चॅलेंज’ देत, “जिल्हा परिषद जिंकून दाखवा, नाव बदलतो” अशी भाषा वापरली.
फायरब्रँड विरुद्ध नवं रक्त
ओमराजे निंबाळकर हे आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि थेट भिडण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या भाषणात धार असते, पण मल्हार पाटलांच्या या ताज्या वक्तव्यात ‘धार’ कमी आणि ‘वैयक्तिक द्वेष’ जास्त दिसला. एका बाजूला जिल्हा विकासाच्या बाबतीत देशात तळाला (तिसऱ्या क्रमांकावर) असताना, तरुण नेतृत्वाने विकासाच्या व्हिजनवर बोलण्याऐवजी, “तुझी औकात काय?” अशी भाषा वापरणे कितपत योग्य आहे?
लोकसभेच्या निकालाला मल्हार यांनी ‘राक्षसी आनंद’ म्हटले. पण आता नगरपालिकेच्या निकालाने मल्हाररावांनाही तोच ‘राजकीय नशा’ चढलाय की काय, अशी चर्चा धाराशिवच्या कट्ट्यांवर रंगली आहे.
वारसा संघर्षाचा की संयमाचा?
मल्हार पाटील हे तरुण रक्त आहे. त्यांना राजकीय भविष्य उज्वल करायचे असेल, तर केवळ वडिलांचा वारसा कामी येणार नाही, तर वाणीवर संयमही ठेवावा लागेल. कारण ओमराजे निंबाळकर हे आता केवळ पवनराजेंचे पुत्र नाहीत, तर ते एक प्रस्थापित आणि जनतेतून निवडून आलेले ‘जायंट किलर’ खासदार आहेत.
जिल्ह्यात राजकारणाची पातळी आधीच घसरली आहे, त्यात आता तिसऱ्या पिढीनेही चिखलफेक सुरू केल्यास, धाराशिवच्या विकासाचे ‘दिवे’ कधी लागणार, हे खुद्द तुळजाभवानीलाच ठाऊक!
थोडक्यात काय? तर मैदानात उतरलेल्या ‘मल्हार’रावांनी सुरुवात तर डॅशिंग केलीय, पण गाडी ‘रिव्हर्स गियर’मध्ये जाऊन घसरू नये, याची काळजी त्यांनाच घ्यावी लागेल!






