बेंबळी : शेतात जाण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका २८ वर्षीय महिलेला शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण केल्याची घटना बोरखेडा (ता. जि. धाराशिव) येथे घडली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ही घटना १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास बोरखेडा शिवारातील गट नं. २३७ मध्ये घडली. फिर्यादी माया संभाजी गायकवाड (वय २८, रा. बोरखेडा) या शेतात जात असताना, आरोपी रमाकांत बळीराम वाघमारे आणि आशाबाई रमाकांत वाघमारे (दोघे रा. बोरखेडा) यांनी त्यांना अडवले.
‘शेतात का जात आहेस?’ या कारणावरून आरोपींनी माया गायकवाड यांच्याशी वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत माया गायकवाड गंभीर जखमी झाल्या आहेत.
उपचारानंतर, माया गायकवाड यांनी १८ जानेवारी २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी रमाकांत वाघमारे आणि आशाबाई वाघमारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ११५(२), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.





