बेंबळी: कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर बेंबळी पोलिसांनी कारवाई केली आहे. चिखली पाटी येथे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ६ बैलांची सुटका केली असून, २ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२ जानेवारी २०२६) सायंकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास बेंबळी हद्दीतील चिखली पाटी येथे संशयास्पद वाटणाऱ्या एका पिकअप वाहनाची (क्रमांक एमएच २४ बीडबल्यु ०५०७) तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनामध्ये ६ पांढऱ्या रंगाचे बैल दाटीवाटीने भरलेले आढळून आले.
आरोपी अरुण तात्याराव राठोड (वय २८, रा. एकंबी तांडा, ता. औसा, जि. लातूर) हा या जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, त्यांना निर्दयतेने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अरुण राठोड याच्याविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात ‘प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम’ कलम ११(१)(डी), ११(१)(ई) आणि ११(१)(के) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.






