अणदूर : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो, याचा प्रत्यय सध्या तुळजापूर तालुक्यात येत आहे. निमित्त आहे पंचायत समिती निवडणुकीचे! अणदूर गणात सध्या असा काही ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ रंगलाय की, विचारता सोय नाही.
वडील काँग्रेसचे ‘वजीर’, पण मुलगा निघाला भाजपचा ‘शिलेदार’!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा तुळजापूर तालुका हा बालेकिल्ला. पण काळ बदलला आणि समीकरणंही! मधुकरराव चव्हाणांचे सुपुत्र सुनील चव्हाण यांनी ‘श्री तुळजाभवानी कारखाना’ वाचवण्यासाठी थेट भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. विशेष म्हणजे, ज्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वडिलांचा (मधुकराव चव्हाण) पराभव केला, त्यांचेच नेतृत्व स्वीकारत सुनील मालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आता याच समीकरणातून सुनील मालकांचे सुपुत्र आणि मधुकररावांचे नातू रणवीर चव्हाण हे भाजपच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत.
‘ऑपरेशन बिनविरोध’ आणि ‘वंचित’चा दणका!
रणवीर चव्हाण यांची ही एन्ट्री ‘ग्रँड’ करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या:
-
सुरुवातीला माजी ग्रामपंचायत सदस्या संजीवनी अरविंद आलुरे यांचे चिरंजीव आण्णासाहेब आलुरे यांचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाला.
-
त्यानंतर खरी खळबळ उडाली ती काँग्रेसच्या उमेदवाराच्या माघारीने! काँग्रेसचे उमेदवार ॲड. विशाल शेटे यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या.


मनसे नरमली, पण ‘वंचित’ नडली!
मैदान साफ करण्यासाठी मनसेचे उमेदवार पवन बसवराज घोगरे यांचीही मनधरणी सुरू आहे. पण, या सगळ्या डावात वंचित बहुजन आघाडीने मात्र मोठा ‘खोडा’ घातला आहे.
सगळे अडथळे दूर झाले असे वाटत असतानाच, वंचितचे उमेदवार आर. एस. गायकवाड हे मात्र आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले आहेत. “काहीही झाले तरी माघार नाही,” अशी भूमिका घेत गायकवाड यांनी रणवीर चव्हाणांच्या ‘बिनविरोध’ विजयाच्या रथाला जोरात ‘ब्रेक’ लावला आहे.
त्यामुळे आता अणदूर गणात ही निवडणूक सरळ होणार की वंचितच्या गुगलीमुळे सामना रंगणार? याकडे संपूर्ण तुळजापूरचे लक्ष लागले आहे.






