भूम- छत्रपती संभाजीनगर येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF) धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. मौजे देवळाली येथे एका शेतात अवैधपणे गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले असून, या कारवाईत सुमारे ७१ हजार रुपये किमतीचा १६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ५० वर्षीय शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की, मौजे देवळाली (ता. भूम, जि. धाराशिव) येथील एका शेतकऱ्याने मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाच्या झाडांची (कॅनबीस) बेकायदेशीर लागवड केली आहे. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पथकाने २३ जानेवारी २०२६ रोजी मौजे देवळाली येथील गोकुळदास रावसाहेब हावळे यांच्या शेतावर (गट नं. ४६२) छापा टाकला.
या छाप्यात शेतजमिनीवर गांजाची लहान-मोठी ५२ झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून ही झाडे उपटून जप्त केली. याचे एकूण वजन १६ किलो असून, बाजारभावानुसार याची किंमत सुमारे ७१,००० रुपये आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी टास्क फोर्सचे स.पो.उप-नि वाहेद मुल्ला यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात आरोपी गोकुळदास रावसाहेब हावळे (वय ५०, रा. देवळाली) याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा १९८५ च्या कलम ८ (क), २० (ब), आणि ११ (ब) अन्वये गुन्हा (र.जी.क्र. ४३/२०२६) दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिस पथकाची कामगिरी
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, पोलीस अधीक्षक जीत टिके, डीवायएसपी गुलाबराव पाटील आणि स.पो.नि. विजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. श्रीमती दिपाली पाटील, के.डी. सपकाळ, स.पो.उप-नि वाहेद मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (हनुमान पुरके, शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरफाळे, नितीन जाधव, रविंद्र साळवे, सुरज जोनवाल, ज्ञानेश्वर चव्हाण, आम्रपाली सूर्यवंशी) केली आहे.
जनतेला आवाहन
युवा वर्ग नशेच्या आहारी जात असल्याने, अशा प्रकारे गांजा किंवा इतर अमली पदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एएनटीएफ (ANTF) विभाग कार्यरत आहे. जनतेला अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती मिळाल्यास त्यांनी ती तत्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सतर्फे करण्यात आले आहे.






