धाराशिव: जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, एकाच दिवशी चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. भूम, धाराशिव ग्रामीण आणि उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या असून, यात एकूण दोन लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ऊसतोड कामगाराचे बंद घर फोडले
भूम तालुक्यातील पाथरुड येथील रहिवासी सावित्रा ऊल पवार (वय ४०) या ऊसतोडीच्या कामासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील सोने-चांदीचे दागिने, घरगुती साहित्य आणि १५०० रुपये रोख असा एकूण ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
-
गुन्हा दाखल: याप्रकरणी सावित्रा पवार यांच्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३३१(३), ३०५, ३२४(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतातील गोठ्यातून तीन म्हशी चोरीला
शेकापूर (ता. जि. धाराशिव) शिवारातील एका शेतातील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी तीन म्हशी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. १२ जानेवारीच्या रात्री ७ ते १३ जानेवारीच्या सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. चोरीला गेलेल्या म्हशींची एकूण किंमत १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे.
-
गुन्हा दाखल: याप्रकरणी अमोल उत्तमराव सोनसाळी (वय ४७, सध्या रा. काळामारुती चौक, धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चालत्या बसमध्ये महिला प्रवाशाची ७० हजारांची रोकड लांबवली
उमरगा ते कलबुर्गी असा बसने प्रवास करत असलेल्या एका महिला प्रवाशाची तब्बल ७० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. तुळसाबाई परमेश्वर गायकवाड (वय ४८, रा. कसगी, ता. उमरगा) या २४ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बसने प्रवास करत होत्या. यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या बॅगमधील रोख रक्कम हातोहात लांबवली.
-
गुन्हा दाखल: याप्रकरणी तुळसाबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







