धाराशिव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MAHABOCW) अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना देण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्य वाटपात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. धाराशिव शहरातील तालीम चौक, भारत विद्यालयासमोर असलेल्या हुसेनी मंजिल येथील घडामोडींमधून या घोटाळ्याची माहिती पुढे आली असून, बोगस कामगार तयार करून कागदपत्रांमध्ये फेरफार करत सरकारी लाभांची उघड लूट सुरू असल्याचा आरोप होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी करण्यात येत असून प्रत्यक्षात बांधकाम क्षेत्राशी संबंध नसलेल्या व्यक्तींनाही कामगार म्हणून नोंदवले जात आहे. या प्रक्रियेत काही एजंट व दलाल सक्रिय असल्याचेही समोर आले आहे. बनावट अनुभव प्रमाणपत्र तयार करून कामगारांच्या नावावर नोंदणी केली जात असून त्यासाठी संबंधितांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याचा आरोप आहे.


योजनेतून मिळणाऱ्या साहित्याच्या वाटपातही मोठा भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा आहे. साहित्य देण्यासाठी ८०० ते १००० रुपये लाच मागितली जात असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर साहित्य वाटपाच्या नावाखाली बनावट पावत्या तयार करून फसवणूक केल्याचेही प्रकार उघड होत आहेत.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृत व्यक्तींच्या नावावरही योजनांचा लाभ घेतला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ खऱ्या कामगारांपर्यंत पोहोचण्याऐवजी दलाल आणि काही संबंधितांच्या खिशात जात असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता कामगार आणि नागरिकांकडून जोर धरत आहे.







