वाशी : बहिणीला नांदवण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून एका ४२ वर्षीय व्यक्तीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना वाशी तालुक्यातील जवळका शिवारात घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात सध्या पुणे परिसरात वास्तव्यास असलेल्या चार संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरमकुंडी फाटा, भूम रोड (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील रहिवासी किरण विनायक शिंदे (वय ४२ वर्षे) यांच्याशी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास जवळका शिवारातील श्रीनिवास आडमुठे यांच्या शेतातील घरासमोर हा प्रकार घडला.
बहिणीला नांदवण्याच्या वादातून संशयित आरोपी जालिंदर बापूजी जगताप (रा. पालसिंगण, ता. जि. बीड, ह.मु. भोसरी, पिंपरी-चिंचवड), मदन ढगे (रा. बेलगाव, ता. भूम, जि. धाराशिव, ह.मु. फुरसुंगी गाव, ता. हवेली, जि. पुणे), अविनाश श्रीनिवास आडमुठे (रा. जवळका, ता. वाशी, ह.मु. थेऊर फाटा, काकडे मळा, ता. हवेली, जि. पुणे) आणि गणेश सतीश आडमुठे (रा. जवळका, ता. वाशी, ह.मु. थेऊर फाटा, काकडे मळा, ता. हवेली, जि. पुणे) यांनी संगनमत करून किरण शिंदे यांना गाठले.
यावेळी आरोपींनी किरण शिंदे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड आणि चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
उपचारानंतर किरण शिंदे यांनी २२ नोव्हेंबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी नमूद चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१) (खुनाचा प्रयत्न करणे), ११८(१) (धोकादायक शस्त्राने दुखापत करणे), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.




