धाराशिव : ग्रामपंचायत कार्यालयात आपले शासकीय कामकाज करत असलेल्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करत बाहेर ओढून काढल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव तालुक्यातील वाघोली येथे उघडकीस आला आहे. आरोपीने एवढ्यावरच न थांबता ग्रामपंचायतीच्या गेटला चक्क कुलूप लावून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश विठ्ठल खडके (रा. वाघोली, ता. जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वाघोलीचे ग्रामपंचायत अधिकारी नवनाथ पोपट काकडे (वय ५०, सध्या रा. रामकृष्ण कॉलनी, उंबरे कोठा, धाराशिव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत अधिकारी नवनाथ काकडे हे वाघोली ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचे नेहमीचे शासकीय कामकाज करत बसले होते. याचवेळी आरोपी सतीश खडके हा तिथे आला. त्याने काकडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना बघून घेण्याची धमकी देत, अक्षरशः ओढत ग्रामपंचायतीच्या बाहेर आणले.
अधिकाऱ्याला बाहेर काढल्यानंतर आरोपीने ग्रामपंचायतीच्या मुख्य गेटला कुलूप लावले आणि काकडे यांना शासकीय कामकाज करण्यापासून मज्जाव करत अडथळा निर्माण केला. या अनपेक्षित आणि अपमानास्पद प्रकारानंतर नवनाथ काकडे यांनी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाणे गाठून या घटनेची सविस्तर तक्रार दिली.
त्यांच्या या प्रथम खबरीवरून पोलिसांनी सोमवारी (ता. ३०) आरोपी सतीश खडके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १३२, २२१, १२६(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलिस करत आहेत.




