परंडा: ‘तु माझ्या निवेदनावर कारवाई का केली नाही? आत्ताच्या आत्ताच माझ्या अर्जावर कारवाई कर’, असे म्हणत शासकीय कर्तव्यावर असलेल्या एका अधिकाऱ्याची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात घडला आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तहसिलदार निलेश मारुती काकडे (वय ३२, हल्ली मुक्काम शासकीय निवासस्थान, तहसील कार्यालय, परंडा) हे त्यांच्या शासकीय कर्तव्यासाठी बुधवारी (दि. १५ एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जात होते. यावेळी परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात योगेश मेटकरी (रा. पिठापुरी, ता. परंडा) आणि त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी तहसिलदार काकडे यांची गाडी अडवली.
यानंतर आरोपींनी मोठमोठ्याने ओरडून ‘तु माझ्या निवेदनावर कारवाई का केली नाही? आत्ताच्या आत्ताच माझ्या अर्जावर कारवाई कर’, असा तगादा लावत फिर्यादीस शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी तहसिलदार निलेश काकडे यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात योगेश मेटकरी आणि एका अनोळखी व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, २२१, २२४, १२६(२), ३५१(२), ३५२, ३(५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११२, ११७ नुसार गुन्हा (गुरनं १६५/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सिरसट हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे, आरोपी योगेश मेटकरी याच्यावर यापूर्वीही शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी (गुरनं २८०/२०२३) पोलिसांत गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे.






