धाराशिव – घरातील गॅस पाईपलाईन कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर बनावट APK फाईल पाठवून एका ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ९६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धाराशिव शहरातील बार्शी नाका परिसरातील ही घटना असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
धाराशिव शहरातील बार्शी नाका, वासुदेव गल्ली (उंबरे कोठा, बोंबले हनुमान मंदिराजवळ) येथील रहिवासी लता अनिल घुगे (वय ६६ वर्षे) या २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ६.१० वाजेच्या दरम्यान घरी उपस्थित होत्या.
या कालावधीत अज्ञात सायबर भामट्यांनी ८७८७५८७६२९ आणि ९३४३६०५७६१ या मोबाईल क्रमांकांवरून त्यांच्याशी संपर्क साधला. गॅस पाईपलाईन कनेक्शनचे बिल व माहिती अपडेट करायची असल्याचे भासवून आरोपींनी लता घुगे यांच्या मोबाईलवर ‘गॅस बिल अपडेट (2)’ नावाची एक बनावट APK (Android Application Package) फाईल पाठवली.
आरोपींच्या भूलथापांना बळी पडून ज्येष्ठ महिलेने ती फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड करताच, सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा (Remote Access) मिळवला. त्यानंतर लता घुगे यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरून (खाते क्र. 05091011000849) टप्प्याटप्प्याने तब्बल ७ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम परस्पर वर्ग करून ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली.
सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लता घुगे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
-
संशयित मोबाईल क्रमांक : ८७८७५८७६२९ आणि ९३४३६०५७६१ चा वापरकर्ता अज्ञात इसम.
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१९(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(सी) आणि ६६(डी).
अनोळखी APK फाईल डाऊनलोड न करण्याचे आवाहन
मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या APK फाईल्स (गॅस बिल, वीज बिल, लॉटरी किंवा बँक अपडेटच्या नावाखाली) डाऊनलोड करू नयेत, तसेच आपली वैयक्तिक व बँकेची माहिती कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तांत्रिक तपास सायबर पोलीस ठाणे करत आहे.




