तुळजापूर : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांनी मिळून एका २३ वर्षीय तरुणावर लोखंडी कोयता आणि दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना तुळजापूर शहरात घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीसह भांडण सोडवण्यासाठी आलेले त्याचे दोन चुलत भाऊदेखील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत सोनवणे आणि पांडू सुरवसे (दोघे रा. तुळजापूर, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर, आनंद चांगदेव जानराव (वय २३, रा. बोरी, ता. तुळजापूर) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १४) सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील उदय हॉटेलजवळ ही घटना घडली. आनंद जानराव आणि आरोपी यांच्यात पूर्वीचे काही वाद होते. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अनिकेत आणि पांडू यांनी आनंद याला गाठले. त्यांनी शिवीगाळ करत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तसेच, जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता आणि दगडाने डोक्यावर व शरीरावर वार करून आनंदला गंभीर जखमी केले.
हा प्रकार पाहून आनंदचे चुलत भाऊ साहिल कैलास जानराव आणि महेश कैलास जानराव हे भांडण सोडवण्यासाठी आणि त्याला वाचवण्यासाठी धावून गेले. मात्र, आरोपींनी त्यांनाही कोयत्याने मारहाण करून जखमी केले व तेथून पोबारा केला.
या भयंकर घटनेनंतर जखमी आनंद जानराव याने बुधवारी (ता. १५) तुळजापूर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपी अनिकेत सोनवणे आणि पांडू सुरवसे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९, १८१(२), ११८(१), १२६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलिस करत आहेत. भररस्त्यात कोयत्याने झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.






