धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पवनचक्कीतील तांब्याच्या तारा आणि साहित्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दरोडा आणि चोरीचे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेगव्हाण शिवारात एक गंभीर घटना घडली होती. पवनचक्कीवर कर्तव्यावर असलेल्या दोन सुरक्षारक्षकांना दोरीने बांधून व त्यांना बेदम मारहाण करून ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात अशाच प्रकारे पवनचक्कीचे साहित्य चोरी जाण्याच्या अनेक घटना वाढल्या होत्या.
या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला हे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे कडक आदेश दिले होते.
दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) कासार आणि त्यांच्या पथकाला एका गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ढोकी-कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचून पोलिसांनी ५ संशयित आरोपींना ३ वाहने आणि चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर फरार साथीदारांच्या मदतीने मेंढा, उमरेगव्हाण, चिकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी आणि वाशी शिवारात पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, चोरी करताना दहशत निर्माण करण्यासाठी आपण तेथील सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याचेही त्यांनी मान्य केले. या टोळीकडून पोलिसांनी रोख रक्कम, तांब्याच्या तारा, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या २ महिंद्रा स्कॉर्पिओ आणि १ बोलेरो जीप असा एकूण ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या या कबुलीवरून दरोडा आणि चोरीचे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या धडक कारवाईत सुनील कालिदास शिंदे (रा. ढोकी), लखन बापू पवार (रा. उपळा), सिद्राम पोपट पवार (रा. वरुडा), उद्धव बापू शिंदे (रा. बावी) आणि विक्रम लक्ष्मण पवार (रा. खामकरवाडी) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे इतर साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पुढील कारवाईसाठी या आरोपींना आणि जप्त केलेल्या मुद्देमालाला बेंबळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, बेंबळी पोलीस ठाण्याचे गणेश पाटील, पोउपनि शिवाजी भुतेकर, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, चालक पोलीस हवालदार नागनाथ गुरव आणि रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.





