भूम: “पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गांजाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना का दिली?” असा जाब विचारत एका तरुणाला बेदम मारहाण करून तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार भूम शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश शामराव पवार (वय ३६, रा. कल्याणनगर, भूम) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता बिरु काळे, रावजी दत्ता काळे, सुब्राव रमेश काळे आणि बप्पा सवंत काळे (सर्व रा. भूम, ता. भूम, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चार महिने सुरू होता छळ
तक्रारीनुसार, भूम पोलीस ठाण्यात आरोपींवर गांजा संदर्भातील एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याची माहिती पोलिसांना फिर्यादी सुरेश पवार यांनीच दिली, असा संशय आरोपींच्या मनात होता. याच रागातून दि. १५ डिसेंबर २०२५ ते दि. २९ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपींनी सुरेश यांना सातत्याने गाठून त्रास देण्यास सुरुवात केली.
लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि धमकी
“तू पोलिसांना माहिती दिल्याने आमचे नुकसान झाले आहे,” असे म्हणत आरोपींनी सुरेश यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. एवढ्या मोठ्या रकमेची मागणी करत आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली. आरोपींच्या या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने पोलिसात धाव घेतली.
चार जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी पीडित सुरेश पवार यांनी मंगळवारी (दि. २६ मे) दिलेल्या प्रथम खबरीवरून भूम पोलीस ठाण्यात आरोपी दत्ता काळे, रावजी काळे, सुब्राव काळे आणि बप्पा काळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(३), ११५(२), ३५२, ३५१(३), ३२४(४), ३(५) सह ११५(अ)/११७ अन्वये खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





