विधान परिषदेच्या धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि अपेक्षेप्रमाणे भाजपने माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. आता या तिन्ही जिल्ह्यांत भाजपचेच पारडे जड असल्याने, पाटील साहेबांचा विजय हा केवळ एक ‘औपचारिकता’ मानला जात आहे. पण या उमेदवारीमुळे जेवढा जल्लोष मुरुममध्ये होत नाहीये, त्याहून अधिक ‘स्मशानशांतता’ एका विशिष्ट आमदाराच्या गोटात पसरली आहे! चला तर मग, या राजकीय नाट्याचा थोडा ‘पोस्टमार्टम’ करूया…
कारखाने, संस्था आणि सत्तेची उब!
बसवराज पाटील म्हणजे उमरगा तालुक्यातील मुरुमचे सुपुत्र. त्यांचे बंधू बापूराव पाटील हे सध्या मुरुम पालिकेचे नगराध्यक्ष. बसवराज पाटील यांचा राजकीय प्रवास म्हणजे ‘वेळेनुसार बदलणाऱ्या हवामानाचा’ उत्तम नमुना. एकेकाळी हेच साहेब काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष होते. उमरगा आणि औसा मतदारसंघावर त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकीही गाजवली.
ते दिवंगत नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांचे ‘मानसपुत्र’. पण राजकारणात मानसपुत्र असण्यापेक्षा ‘सत्तापुत्र’ असणं जास्त गरजेचं असतं, हे पाटलांना लवकरच समजलं. चाकूरकरांचे काँग्रेसमधले वजन घटले आणि इकडे बसवराज पाटलांची गाडी स्लो झाली. त्यात भर म्हणून केंद्रात आणि राज्यात भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार आले. आता ज्या माणसाकडे स्वतःचा साखर कारखाना आणि शिक्षण संस्थांचा डोलारा आहे, त्याला सत्तेची उब लागतेच ना! कामं अडून पडायला लागली, फाइल्सवर धूळ साचू लागली आणि मग अचानक २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पाटलांना ‘कमळा’चा सुगंध आवडू लागला.
भाजपची बंपर लॉटरी
भाजपनेही या लिंगायत चेहऱ्याचे आणि धाराशिव-लातूरमधील त्यांच्या वजनाचे स्वागत केले. काही महिन्यांपूर्वी त्यांना लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद दिले आणि आता थेट विधान परिषदेची उमेदवारी! थोडक्यात सांगायचे तर, काँग्रेसमध्ये असताना जी कामे रखडली होती, ती आता थेट ‘सुपरफास्ट’ ट्रॅकवर धावणार आहेत.
तुळजापूरच्या गोटात ‘सन्नाटा’ आणि फेसबुकवर ‘पोपटपंची’
आता या सगळ्यात खरी गंमत सुरू आहे ती तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गोटात. बसवराज पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून राणादादांच्या तंबूत अशी काही शांतता पसरली आहे, जणू कुणीतरी त्यांचा माईकच हिरावून घेतलाय!
या शांततेत भर म्हणून काही ‘फेसबुक वीर’ आणि पोपटपंची करणारे कार्यकर्ते सोशल मीडियावर सुविचार टाकत आहेत: “निष्ठावंतांचा संयम म्हणजे हतबलता नव्हे.” आता यातला मोठा विनोद हा आहे की, राणा पाटील स्वतः २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये ‘आयात’ झालेले आहेत! त्यामुळे इथे ‘निष्ठावान’ नक्की कोण, हा संशोधनाचा विषय आहे.
दत्ता कुलकर्णींचा बळी आणि अंगलट आलेला डाव?
या निवडणुकीसाठी मूळ भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर होते. पण “जिल्ह्यात दुसरा कुणी मोठा होऊ नये आणि सवता सुभा निर्माण होऊ नये” म्हणून अंतर्गत विरोधकांनी (वाचा: कोणा एका आमदाराने) कुलकर्णींचा पत्ता कट केला, असे आता उघडपणे बोलले जात आहे. पण गरिबाचा पत्ता कट करण्याच्या नादात, आता थेट बसवराज पाटील यांच्यासारखा ‘हेवीवेट’ नेताच बोकांडी बसला आहे!
पुढे काय? एका म्यानात दोन तलवारी?
राणा पाटील आणि बसवराज पाटील यांचा इतिहास पाहिला, तर या दोघांचे कधीच सूत जुळले नाही. पूर्वी एक राष्ट्रवादीत होता तर दुसरा काँग्रेसमध्ये. आता दोघेही एकाच ‘कमळ’ पक्षात आहेत. पण राजकीय वजनाचा विचार केला, तर बसवराज पाटील हे राणा पाटलांपेक्षा ‘सरस’ आणि ताकदवान नेते मानले जातात.
आता बसवराज पाटील विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले, की धाराशिव जिल्ह्यात राणा पाटलांची असलेली ‘एकहाती सद्दी’ मोडीत निघणार, हे नक्की. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालापेक्षा, त्यानंतर या दोन ‘पाटलांच्या’ शीतयुद्धात नक्की काय काय ठिणग्या उडणार, याकडेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात काय… पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!






