धाराशिव | खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देत सोमवारी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही तासांतच धाराशिव जिल्ह्यातील शिंदे सेनेच्या संघटनात्मक पातळीवर मोठी उलथापालथ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना आणि अंगीकृत संघटनांची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्याचे आदेश पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील सर्व कार्यकारिण्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रभारी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्यासह सर्व विद्यमान पदाधिकाऱ्यांची पदे आपोआप रद्द झाली आहेत.
राजकीय वर्तुळात अजित पिंगळे हे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे समर्थक मानले जात होते. काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही स्थानिक संघटनात्मक प्रश्नांवर नाराजीचा सूर उमटल्याचे सांगितले जाते.
ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेला जिल्ह्यात मोठे राजकीय बळ मिळाले असले, तरी विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेबाबत ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवक्त्याने महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. “नवीन कार्यकारिणी निवडताना जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा समतोल साधला जाईल. पक्षासाठी काम केलेल्या जुन्या शिवसैनिकांसह नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनाही योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही आणि कुणीही पाण्यात जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
जुन्या-नव्यांचा मेळ हा नवा फॉर्म्युला
ओमराजे निंबाळकर यांच्या आगमनानंतर जिल्ह्यातील शिंदे सेनेची संघटनात्मक रचना नव्याने उभी राहणार आहे. त्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलले जाणार की नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने “जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा मेळ घालूनच नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल” असा संदेश दिल्याने संभाव्य नाराजी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शिंदे सेनेची नवी कार्यकारिणी आता कोणाच्या नेतृत्वाखाली आणि कोणत्या चेहऱ्यांसह उभी राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






