धाराशिव : भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विकत घेतलेल्या कळंब तालुक्यातील हावरगाव येथील **डीडीएन एसएफए लि. साखर कारखान्याकडून २०२५-२६ च्या गळीत हंगामातील ऊस वाहतुकीचे भाडे अद्याप मिळाले नसल्याने ऊस वाहतूकदार, वाहनमालक आणि चालक आक्रमक झाले आहेत. थकीत रक्कम तातडीने अदा न केल्यास १७ जुलै रोजी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित वाहतूकदारांनी दिला आहे.
२०२५-२६ च्या गळीत हंगामात कारखान्यासाठी ऊस वाहतूक केलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात भाडे थकीत असल्याचा वाहतूकदारांचा आरोप आहे. अनेक वेळा कारखाना प्रशासनाकडे थकीत रक्कम देण्याची मागणी करूनही अद्याप पेमेंट मिळाले नसल्याने वाहनमालक आणि चालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
ऊस वाहतुकीसाठी वाहनमालकांना डिझेल, वाहनांचे हप्ते, दुरुस्ती, चालकांचे वेतन आणि इतर खर्च करावे लागतात. मात्र, गळीत हंगाम संपल्यानंतरही हक्काचे पैसे मिळत नसल्याने अनेक वाहतूकदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूकदार आणि चालकांनी कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देऊन थकीत ऊस वाहतूक भाड्याची रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास १७ जुलै रोजी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करून आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी संबंधित कारखान्याकडील थकीत ऊस वाहतूक भाड्याचा प्रश्न आता चिघळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे १७ जुलैपूर्वी कारखाना प्रशासन वाहतूकदारांची थकीत रक्कम अदा करणार का, याकडे लक्ष लागले आहे.




