आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्राच्या मातीला एक वेगळाच सुवास येतो. हा सुवास असतो भक्तीचा, श्रद्धेचा आणि अथांग माऊलींच्या मायेचा. लाखो पावले पंढरीच्या दिशेने चालू लागतात. टाळ-मृदंगाचा गजर, पताकांचा भार आणि मुखात फक्त एकच नाव—“ज्ञानोबा-तुकाराम”.
याच वारीच्या वाटेवर विठ्ठल भक्तीचं एक असं मर्म उलगडतं, जे मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्येही सापडणार नाही. वारीच्या वाटेवर चालणाऱ्या एका ९० वर्षांच्या आजीबाईंना कुणीतरी सहज विचारलं, “आजी, तुमची ही कितवी वारी?”
त्या माऊलीने कपाळावरच्या बुक्क्याला स्पर्श केला, डोळे मिटले आणि अत्यंत सहजतेने उत्तर दिलं:
“वारी मोजायची नसते रे बाबा, वारी तर पेरायची असते!”
किती अथांग आणि खोल विचार आहे हा! आपण आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो—नफा-तोटा, सुख-दुःख, वय आणि वर्षे. पण वारी हा हिशोबाचा पोरखेळ नाही. वारी म्हणजे अंताकडून अनंताकडे जाणारा प्रवास आहे. वारी मोजायची नसते, कारण भक्ती कधी मोजता येत नाही. ती मनाच्या गाभाऱ्यात पेरायची असते, जेणेकरून पुढच्या पिढ्यांमध्येही ती भक्ती, ती संस्कृती आणि तो संतांचा वारसा अंकुरत राहील.
मागणं काय? …आहे तसं ने, कुणाला त्रास नको!
आजच्या जगात माणसाच्या मागण्यांची यादी कधीच संपत नाही. मंदिरात पाऊल ठेवण्यापूर्वीच माणसाची ‘मागण्यांची पावती’ तयार असते. पण ९० वर्षांच्या त्या माऊलीला जेव्हा विचारलं, “आजी, विठ्ठलाकडे काय मागणार?” तेव्हा तिने जे सांगितलं, ते ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
तिची मागणी अगदी साधी, निगर्वी आणि निष्पाप होती:
-
“आहे तसं ने…” (माझं हे आयुष्य, माझं हे म्हातारपण जसं आहे, तसंच स्वीकारून मला तुझ्या चरणाशी घे.)
-
“कुणाला त्रास नको…” (माझ्यामुळे या जगातल्या कोणत्याही जीवाला, अगदी माझ्या पोटच्या पोरांनाही कधी त्रास होऊ नये.)
हाच तर खरा वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. स्वतःसाठी काहीही न मागता, उलट जगाच्या कल्याणाची आणि स्वतःच्या सात्विक अंताची प्रार्थना करणे, हीच खरी वारी आहे. ‘तुका म्हणे आता । (माझं) उरलेलं नाही काही…’ ही भावना वारी पावलोपावली शिकवते.
दर्शनाचे ३६ तास: कष्ट नव्हे, हा तर आनंदाचा सोहळा!
पंढरपुरात पोहोचल्यावर विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी कधी कधी २४ ते ३६ तास रांगेत उभे राहावे लागते. ९० वर्षांचं वय, पायात त्राण नाही, डोळ्यांवर झापड, पण तरीही त्या रांगेत उभे राहताना चेहऱ्यावर थकवा नसतो, तर एक वेगळंच तेज असतं.
“भजन, नामस्मरण करत उभं राहायचं… येतो मग पांडुरंग!”
३६ तास उभं राहणं ही कोणत्याही सामान्य माणसासाठी शिक्षा ठरेल. पण वारकऱ्यासाठी ही तपश्चर्या असते. टाळ वाजवत, विठ्ठलाचे अभंग गात, नामस्मरण करत ती माऊली रांगेत उभी राहते. तिला माहिती असतं की, आपण विठ्ठलाकडे चालत जात नाही आहोत, तर आपण जसे जसे पुढे जाऊ, तसा तसा आपला पांडुरंग स्वतः आपल्याला भेटायला पुढे येत आहे.
वारी ही जीवनपद्धती आहे
वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाऊन येणं नव्हे. वारी म्हणजे अहंकार विसरून माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं. एका ९० वर्षांच्या आजीने वारीचं हे जे तत्वज्ञान सांगितलं, ते थक्क करणारं आहे.
-
वारी आपल्याला सोसायला शिकवते.
-
वारी आपल्याला मागायला नव्हे, तर त्याग करायला शिकवते.
-
आणि सगळ्यात महत्त्वाचं, वारी आपल्याला ‘मी’ पणा विसरून ‘आम्ही’ व्हायला शिकवते.
चला, आपणही या आषाढीच्या निमित्ताने आपल्या मनात विठ्ठल भक्तीची आणि माणुसकीची एक वारी पेरूया… जिथे हिशोब नसतील, फक्त आणि फक्त अथांग प्रेम असेल!
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!
- सुनील मधुकर ढेपे





