धाराशिव | धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना 2026-27 अंतर्गत तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी खासदार ओमप्रकाश (ओमराजे) राजेनिंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली.
या निधीचा लाभ मतदारसंघातील 139 गावांतील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांना होणार असून विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. यात पाणीपुरवठा योजना, पोहोच रस्ते व अंतर्गत रस्ते, गटारे बांधकाम, स्मशानभूमी विकास, पथदिवे उभारणी तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे या वस्त्यांमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वसमावेशक व समतोल विकास साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक वस्तीपर्यंत आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी भविष्यातही पाठपुरावा सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या निधी मंजुरीबद्दल खासदार निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे आभार मानले. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.




