येरमाळा – बौद्धिक दिव्यांगत्व (मतिमंदत्व) असल्याचे पूर्णपणे माहीत असतानाही एका दिव्यांग दांपत्यासह त्यांच्या वृद्ध आईला घरात शिरून लोखंडी पट्टी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना कळंब तालुक्यातील वाघोली येथे घडली आहे. “तुम्ही येथे कसे राहता तेच बघतो,” अशी धमकी देत दहशत निर्माण करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियमासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
वाघोली (ता. कळंब) येथील रहिवासी संगीता अनंत सुतार (वय ४१ वर्षे) यांचा भाऊ प्रदीप सुतार आणि भावजय सविता सुतार हे दोघेही बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग आहेत. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४.३० ते ४.४५ वाजेच्या सुमारास वाघोली येथे संशयित आरोपींनी सविता सुतार यांनी शिवीगाळ केल्याचा खोटा आळ घेतला.
सविता व प्रदीप हे दोघेही दिव्यांग आहेत याची पूर्ण कल्पना असतानाही गावातील संशयित आरोपी शाम उर्फ बापू प्रभू कोळी, रेणुका शाम कोळी आणि पार्वती प्रभू कोळी यांनी संगनमत करून त्यांना गाठले. आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत सविता व प्रदीप यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी पट्टीने बेदम मारहाण करून जखमी केले. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादीची वृद्ध आई मध्यस्थी करायला धावली असता, आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “तुम्ही गावात कसे राहता तेच बघतो,” अशी उघड धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत माजवली.
येरमाळा पोलिसांत गुन्हा नोंद
या अमानुष मारहाणीनंतर जखमींवर उपचार करण्यात आले. त्यानंतर संगीता सुतार यांनी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
-
आरोपी :
१) शाम उर्फ बापू प्रभू कोळी
२) रेणुका शाम उर्फ बापू कोळी
३) पार्वती प्रभू कोळी (सर्व रा. वाघोली, ता. कळंब, जि. धाराशिव)
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३(५) सह दिव्यांग व्यक्ती हक्क संरक्षण अधिनियम (RPwD Act) २०१६ चे कलम ९२(ए) आणि ९२(बी).
विशेष गरजा असणाऱ्या बौद्धिक दिव्यांग व्यक्तींवर आणि वृद्ध महिलेवर अशा प्रकारे घरात जाऊन हिंसक हल्ला केल्यामुळे वाघोली परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, येरमाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.




