तामलवाडी – तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे व देवघराचे कुलूप तोडून १३ तोळे चांदीचे दागिने आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील पात्रातील रोख रक्कम असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
सावरगाव (ता. तुळजापूर) येथील रहिवासी अनिरुद्ध प्रभाकर हागरे (माळी) (वय ४१ वर्षे) यांच्या राहत्या घरात ७ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.४५ ते २.०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश केला.
चोरट्याने घरातील देवघराचे कुलूप तोडून आत ठेवलेल्या लोखंडी पेटीतील १३ तोळे वजनाचे चांदीचे दागिने तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथील पात्रातील ७ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. चोरीचा हा प्रकार सकाळी उघडकीस आला.
तामलवाडी पोलिसांत गुन्हा नोंद
याप्रकरणी अनिरुद्ध हागरे (माळी) यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून तामलवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) (रात्री घरफोडी) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.




