येरमाळा – उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासानंतर मराठवाड्याची ‘शिवकाशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेरखेडा (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील फटाका उद्योगावर स्थानिक प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. गुरुवारी (ता. १७) महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत केलेल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याने गट क्र. २१३ मधील प्रसिद्ध ‘भवानी फायर वर्क्स’ या कारखान्याचे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटी
वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने ‘विस्फोटक नियम, २००८’ मधील तरतुदींनुसार या कारखान्याची झाडाझडती घेतली. या तपासणीत पुढील गंभीर बाबी उघडकीस आल्या:
-
अतिरिक्त दारूगोळा साठा: परवान्यात नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने अधिक गनपावडर (दारू) व स्फोटकांचा साठा आढळून आला.
-
अनधिकृत बांधकाम: कारखान्याच्या अधिकृत मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त बांधकाम करण्यात आले होते.
-
सुरक्षेचा अभाव: परिसराला सर्व बाजूंनी आवश्यक असणारे सुरक्षा कुंपण (Fencing) नव्हते.
-
अग्निसुरक्षा नियमांची पायमल्ली: कारखान्याकडे अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) नव्हते, तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारी अग्निशामक उपकरणे पुरेशा प्रमाणात नव्हती.
-
परवाना नूतनीकरणातील त्रुटी: नूतनीकरणाची अधिकृत प्रत सादर करण्यात व्यवस्थापनाला अपयश आले. (मात्र, कारखान्यातील सुमारे ४० कामगारांचा विमा उतरवल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.)
या त्रुटींमुळे मानवी जीविताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने उत्पादन बंदची कारवाई केली. या कारवाई पथकात तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, येरमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत घोडके, नायब तहसीलदार श्रीकिसन सांगळे, सहायक महसूल अधिकारी विजय अंकुशे यांच्यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते.
कारवाई केवळ फार्स की मुळावर घाव?
उत्तर प्रदेशातील बिजनौर पोलिसांनी तेरखेडा येथील रहिवासी यासीन अहेमद हा काडतुसे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गनपावडर पुरवत असल्याचा पर्दाफाश केला होता. त्याचे धागेदोरे शोधत यूपी पोलिसांनी बुधवारी (ता. १६) तेरखेड्यात छापा टाकला. संशयित आरोपी यासीन अहेमद सध्या फरार असून त्याचे मुंबई आणि तेरखेडा येथे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. यूपी पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर खडबडून जागे झालेल्या स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाने केलेली ही कारवाई केवळ एक ‘औपचारिक फार्स’ ठरणार, की यामागील बेकायदा स्फोटक साठा व पुरवठ्याच्या काळ्या धंद्यावर कायमस्वरूपी कारवाई होणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाचा इशारा
विस्फोटक नियम, २००८ मधील नियमांचे उल्लंघन करून अथवा मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने स्फोटके व दारूगोळा हाताळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा वाशी तहसील कार्यालयाकडून देण्यात आला आहे.




