वाशी – आयशर टेम्पोच्या नोटरीच्या वेळी फाईलमध्ये डिझेल खर्चासाठी ठेवलेला कोरा चेक चोरून त्यावर वाहन मालकाची बनावट सही करत तब्बल ८ लाख रुपयांची रक्कम लिहून बँकेत वटवून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर जाब विचारल्यानंतर पीडितास जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध फसवणूक, बनावट दस्तऐवज आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
ईट (ता. भूम, जि. धाराशिव) येथील रहिवासी प्रतीक साहेबराव सांगवीकर (वय ३७ वर्षे) यांच्या मालकीचा आयशर टेम्पो (क्रमांक MH 25 AJ 9091) आहे. सदर टेम्पोच्या नोटरी व्यवहारादरम्यान, त्यांनी टेम्पोच्या फाईलमध्ये डिझेलच्या खर्चासाठी एक कोरा चेक ठेवला होता.
पाथरुड (ता. भूम) येथील रहिवासी संशयित आरोपी ईश्वर दत्तात्रय जाधव याने ९ जुलै २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सदर टेम्पोच्या फाईलमधून तो कोरा चेक परस्पर काढून घेतला. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या ईट शाखेतील खात्याचा असलेला हा कोरा चेक वापरून त्यावर प्रतीक सांगवीकर यांची बनावट व खोटी सही केली. चेकवर तब्बल ८ लाख रुपये (₹८,००,०००/-) इतकी रक्कम भरून तो बँकेत जमा केला आणि फिर्यादीची मोठी आर्थिक फसवणूक केली. या आर्थिक नुकसानीबाबत विचारणा केली असता आरोपीने फिर्यादीस सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक अश्लील शिवीगाळ करत अपमानित केले.
वाशी पोलिसांत अॅट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा नोंद
फसवणूक आणि अपमानास्पद वागणुकीनंतर प्रतीक सांगवीकर यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
-
आरोपी : ईश्वर दत्तात्रय जाधव (रा. पाथरुड, ता. भूम, जि. धाराशिव).
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) (फसवणूक), ३३३(३), ३४०(२), ३५२ सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (Atrocity Act) कलम ३(१)(आर), ३(१)(एस) आणि ३(२)(व्हिए).
बनावट सही करून लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस करत आहेत.



