उमरगा – हैदराबादहून महाराष्ट्रात टोयोटा इनोव्हा कारमधून बेकायदेशीररीत्या गुटख्याची मोठी खेप घेऊन जाणाऱ्या आंतरराज्य तस्करांवर उमरगा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील तळमोड चेकपोस्टवर पोलिसांनी इनोव्हा कार अडवून सुमारे ९ लाख ७ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण १६ लाख ७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तेलंगणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पहाटे ३ वाजता तळमोड चेकपोस्टवर नाकाबंदी
पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली होती की, हैदराबाद येथून एका गजगा (राखाडी) रंगाच्या इनोव्हा कारमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी हालचाली गतिमान करत १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास तळमोड चेकपोस्टवर कडक नाकाबंदी लावली.
पहाटे ५.०० वाजेच्या सुमारास बसवकल्याण बाजूकडून संशयित टोयोटा इनोव्हा कार (क्रमांक AP 23 L 2478) येताना दिसली. पोलिसांनी इशारा करून गाडी थांबवली. कारची तपासणी केली असता मागच्या सीटवर पांढऱ्या रंगाच्या अनेक गोण्या भरून ठेवल्याचे निदर्शनास आले.
तपासणीत सापडला ‘हाय’ कंपनीचा गुटखा; दोघे गजाआड
गोण्यांमध्ये काय आहे याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, चालकाने व त्याच्या साथीदाराने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. संशय बळावल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष गोण्या उघडून पाहिल्या असता, त्यात प्रतिबंधित ‘हाय’ (Hye) कंपनीच्या गुटख्याची पाकिटे आढळून आली.
पोलिसांनी तत्काळ वाहन व मुद्देमाल उमरगा पोलीस ठाण्यात आणला आणि घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली.
अटक करण्यात आलेले आरोपी : १) मोहम्मद जमील मोहम्मद अहमद खान (वय ३२ वर्षे, रा. १-२८/१ मालरेड्डी, कोसगी मंडल, पोस्ट कोसगी, जि. मेहबूबनगर; सध्या रा. शास्त्रीपुरम, राजेंद्रनगर मंडल, जि. रंगारेड्डी, तेलंगणा).
२) अली खान (वय २७ वर्षे, वडील: मोहम्मद अली, रा. प्लॉट नं. ८, नुरी नगर, बांडलागुडा, पोस्ट केशोगिरी, बांडलागुडा मंडल, जि. हैदराबाद, तेलंगणा).
१६ लाखांचा मुद्देमाल जप्त; अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल
धाराशिवच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती पल्लवी इंबडे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात येऊन जप्त अन्नपदार्थाचा रीतसर पंचनामा केला. कारवाईदरम्यान:
-
‘हाय’ कंपनीच्या गुटख्याचे १२९६ पुडे (२४ गोण्या): किंमत ₹९,०७,२००/-
-
टोयोटा इनोव्हा कार (AP 23 L 2478): अंदाजे किंमत ₹७,००,०००/-
-
एकूण जप्त मुद्देमाल : ₹१६,०७,२००/-
अन्न सुरक्षा अधिकारी पल्लवी इंबडे यांनी दिलेल्या सरकारतर्फे फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम २६(२)(iv), २७(३)(d), २७(३)(e) आणि ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी करत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची धडक कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, पोलीस हवालदार शिवलिंग घोळसगाव, पोलीस अंमलदार प्रवीण नळेगावकर, भागवत घाटे तसेच होमगार्ड पुजारी (१२९१), पवार (९१७), राठोड (१२८१) आणि चौधरी (१२९५) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



