तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील मटका बुक्कीमालकाला व्हीआयपी दर्शन आणि बनावट पासेस प्रकरणातील प्रशासकीय कारवाईचा फास आता राजकीय पदाधिकाऱ्यांभोवती आवळू लागला आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजापूरचे भाजपचे नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांना थेट ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. “आपले मंदिर संस्थानचे विश्वस्त पद का रद्द करण्यात येऊ नये?”, अशी विचारणा करत जिल्हाधिकाऱ्यांनी गंगणे यांना पुढील ४८ तासांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले यांच्या निलंबनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उचललेल्या या कठोर पावलामुळे तुळजापूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नोटिशीतील प्रमुख मुद्दे
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना अनधिकृतपणे व्हीआयपी प्रवेश मिळवून देणे, मंदिर नियमांचे उल्लंघन करणे आणि संस्थानच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत ‘श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळा’ने यापूर्वी अधिकृत तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या व प्राथमिक चौकशीच्या आधारे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ही नोटीस बजावली आहे. विश्वस्त या नात्याने मंदिराच्या नियमावलीचे रक्षण करण्याऐवजी गैरप्रकारांना खतपाणी घातल्याचा संशय व्यक्त करत, नियमानुसार हे विश्वस्त पद का काढून घेतले जाऊ नये, याचा स्पष्ट खुलासा ४८ तासांत देण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत.
“माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे; नोटीस राजकीय दबावातून”: विनोद गंगणे
जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिशीनंतर नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांनी आपली बाजू मांडत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
-
कुटुंबासह दर्शनाला गेलो होतो: “मी मंदिर संस्थानचा विश्वस्त या नात्याने केवळ माझ्या कुटुंबासह मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मी कोणत्याही अनोळखी किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला गाभाऱ्यात सोडलेले नाही.”
-
कर्मचाऱ्यांना दमदाटी नाही: “मंदिरातील कोणत्याही कर्मचाऱ्याला दमदाटी किंवा दबाव टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी स्वतः मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलेला नाही.”
-
राजकीय दबावातून नोटीस: “जिल्हाधिकाऱ्यांनी मला बजावलेली ही नोटीस पूर्णपणे राजकीय दबावातून दिलेली आहे. माझी राजकीय आणि सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव आहे,” असा थेट पलटवार गंगणे यांनी केला आहे.
४८ तासांत काय होणार?
एकीकडे धार्मिक व्यवस्थापकावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळलेली असताना, आता भाजपच्या नगराध्यक्षांना विश्वस्त पदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विनोद गंगणे पुढील ४८ तासांत जिल्हाधिकाऱ्यांना काय खुलासा सादर करतात आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार या खुलाशानंतर त्यांच्या विश्वस्त पदावर काय अंतिम निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


