तुळजापूर, ता. १६ : तुळजापूर शहरात गर्दीचा फायदा घेत चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्याबाबत चौकशी सुरू आहे.
पहिल्या घटनेत लोहारा येथील अशरफबी महमंद हनिफ शेख (वय ८०) या १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५० ते १२.५५च्या सुमारास तुळजापूर बसस्थानकात लातूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. चोरीस गेलेल्या मंगळसूत्राची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलिसांत भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत लातूर जिल्ह्यातील औसा येथील वैशाली विकास कुसुमकर (वय ३०) या १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५च्या सुमारास तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर होत्या. त्यावेळी त्यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि पर्स, असा सुमारे १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
या प्रकरणी पोलिसांनी करिश्मा सोमनाथ भोसले (वय २२) आणि शितल भगवान भोसले (वय ३०), दोघी रा. थेरगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोन्ही घटनांचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.



