धाराशिव – धाराशिव शहरातील गणेशनगर (रोहिदास कॉलनी) भागात कौटुंबिक वादातून वृद्ध वडिलांना मुलगा आणि सुनेने संगनमत करून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. वडिलांना लाथाबुक्क्यांनी व चपलेने मारहाण करून गंभीर जखमी केले असून, वाद सोडवण्यासाठी आलेल्या वृद्ध आई आणि बहिणीलाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित ६७ वर्षीय वडिलांच्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मुलगा व सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
गणेशनगर, रोहिदास कॉलनी (धाराशिव) येथील रहिवासी बबनराव रामा नरसुडे (वय ६७ वर्षे) हे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.०० वाजेच्या सुमारास आपल्या घरात उपस्थित होते.
त्यावेळी त्यांचा मुलगा पंकज आणि सून पल्लवी यांनी जुन्या कौटुंबिक वादातून संगनमत करून बबनराव यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी मिळून बबनराव यांना लाथाबुक्क्यांनी तसेच चपलेने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ६७ वर्षीय बबनराव नरसुडे हे गंभीर जखमी झाले.
आई व मुलगी सोडवायला धावल्या, त्यांनाही मारहाण
मारहाणीचा हा प्रकार सुरू असताना बबनराव यांच्या पत्नी आणि मुलगी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आल्या. मात्र, संशयित मुलगा व सुनेने त्यांनाही न जुमानता लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “यापुढे मध्ये आलात तर तुम्हा सर्वांना जिवंत सोडणार नाही,” अशी उघड धमकी देत आरोपींनी दहशत माजवली.
धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा नोंद
कौटुंबिक छळ व गंभीर मारहाणीनंतर बबनराव नरसुडे यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी मुलगा व सुनेविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे:
-
आरोपी :
१) पंकज बबनराव नरसुडे
२) पल्लवी पंकज नरसुडे (दोघे रा. गणेशनगर, रोहिदास कॉलनी, धाराशिव)
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(२) (गंभीर दुखापत करणे), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंगाच्या उद्देशाने शिवीगाळ करणे), ३५१(२) (धमकी देणे) आणि ३(५) (समान हेतू).
वृद्ध आई-वडिलांवर मुलानेच अशा प्रकारे हात उचलल्याच्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व संताप व्यक्त होत असून, धाराशिव शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




