तुळजापूर – तुळजापूर येथील नवीन बसस्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन एका ७९ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेली पोत चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. नळदुर्गकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना हा चोरीचा प्रकार घडला असून, पीडित वृद्धेच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात सोलापूर येथील एका महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मूळ रमाबाई झोपडपट्टी (सोलापूर) येथील रहिवासी व सध्या तीर्थ खुर्द (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे वास्तव्यास असलेल्या केसरबाई दामोदर गायकवाड (वय ७९ वर्षे) या २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील नवीन बसस्थानकात आल्या होत्या.
त्या नळदुर्गकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत संशयित महिला मिना बजरंग जाधव हिने केसरबाई गायकवाड यांच्या गळ्यावर हात साफ केला. तिने केसरबाई यांच्या गळ्यातील अंदाजे १५ हजार रुपये किमतीची, अडीच ग्रॅम वजनाची ४४ सोन्याचे मणी असलेली पोत शिताफीने चोरून नेली.
तुळजापूर पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंद
गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर केसरबाई गायकवाड यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
-
आरोपी : मिना बजरंग जाधव (रा. मंजुनाथ नगर, ता. जि. सोलापूर).
-
दाखल कलम : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) (चोरी).
तुळजापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीत महिला पाकीटमार व चोरांचा वावर पुन्हा एकदा समोर आला असून, तुळजापूर पोलीस या चोरीच्या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



