धाराशिव: कोंड (ता. जि. धाराशिव) ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थ राणाप्रताप रणधीर पाटील यांनी २३ नोव्हेंबर २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील कायदेशीर नोटीस त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.
तक्रारदार राणाप्रताप पाटील यांनी यापूर्वी २१ ऑक्टोबर व २६ ऑक्टोबर रोजी प्रशासनाकडे लेखी तक्रार आणि आवश्यक पुरावे सादर केले होते. मात्र, प्रशासनाने त्यावर कोणतीही ठोस कारवाई अथवा चौकशी न केल्याने प्रशासकीय उदासीनतेविरोधात अखेरचा मार्ग म्हणून उपोषणाचा पवित्रा घेतल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
प्रमुख मागण्या:
-
कोंड ग्रामपंचायतीमधील सर्व आर्थिक व्यवहार, विकासकामे आणि शासकीय निधीच्या वापराची तात्काळ निष्पक्ष चौकशी (Audit & Inquiry) करण्यात यावी.
-
वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती नियुक्त करून चौकशीअंती दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत.
-
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शासनाची कथित फसवणूक करून मिळवलेल्या बक्षिसाची सखोल चौकशी व्हावी.
-
यापूर्वी सादर केलेल्या तक्रार अर्जांवर प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली, याचा अधिकृत लेखी अहवाल मिळावा.
जोपर्यंत मागण्या लेखी स्वरूपात मान्य होऊन चौकशीचे अधिकृत आदेश जारी होत नाहीत, तोपर्यंत अन्नत्याग करून उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच, उपोषणादरम्यान आरोग्यास काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांची राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडेही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.





