येरमाळा (कळंब) : कोणत्याही प्रकारची चारा-पाण्याची सोय न करता पिकअप वाहनात दाटीवाटीने कोंबून गोवंशीय जनावरांची अवैध व निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या बार्शी तालुक्यातील एका चालकावर येरमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह गोवंशीय जनावरे असा एकूण २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:०४ वाजेच्या सुमारास येरमाळा पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना बार्शी ते कळंब रस्त्यावरील जावेद कलेक्शनसमोर संशयास्पद हालचाली दिसल्या. पोलिसांनी एका पिकअप वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये १ जर्सी गाय, २ खोंड, १ कारवड आणि १ बैल अशी गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरपणे व दाटीवाटीने कोंबून भरल्याचे निदर्शनास आले. या जनावरांसाठी कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.
पोलिसांनी चौकशी केली असता वाहनचालक राजेश दिलीप चौधरी (वय ३५ वर्षे, रा. पिंपळवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा विनापरवाना व निर्दयतेने या जनावरांची वाहतूक करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी पिकअप वाहनासह जनावरे असा एकूण २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी सरकारतर्फे आरोपी राजेश चौधरी याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(डी), ११(एफ)(एच)(के), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ५(अ)(१)(२), ५(ब) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ आणि मोटार वाहन कायदा कलम ८३/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.




