पहाटे अडीच वाजता आग, अग्निशमन दलाची गाडी पोहोचली चार वाजता; गाडीत डिझेल आणि पाणी नसल्याचा खळबळजनक आरोप; जवानांकडे प्रशिक्षण व आवश्यक साधनांचाही अभाव? आमदार प्रतापसिंह पाटील संतप्त, खासदार ओमराजे निंबाळकर यांची धाराशिवला चार अग्निशमन वाहने देण्याची मागणी
धाराशिव : येडशी येथे ऐन दिवाळीत घडलेल्या भीषण अग्नितांडवात करंडे कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असतानाच आता अग्निशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आग पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास लागली असताना धाराशिव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पहाटे चार वाजता पोहोचल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन वाहनात डिझेल आणि पाणी नसल्याचा, तसेच जवानांकडे आवश्यक प्रशिक्षण आणि धुरातून बचावकार्य करण्यासाठी लागणारी साधने नसल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
वेळीच अग्निशमन दल पोहोचले असते, तर काही जीव वाचले असते असा संतप्त सवाल आता येडशीकर उपस्थित करीत आहेत. धाराशिव लाईव्हचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी ग्रामस्थांशी संवाद साधून या संतप्त प्रतिक्रिया आणि प्रशासनाच्या कारभारावर उपस्थित झालेले प्रश्न समोर आणले आहेत.
अडीच वाजता आग, अग्निशमन दल चार वाजता पोहोचले!
येडशी येथील करंडे गिफ्ट सेंटर आणि किराणा दुकानाला लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. दुकानाच्या वरच्या मजल्यावर करंडे कुटुंब वास्तव्यास होते. या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला, तर कृष्णा करंडे हा एकमेव तरुण बचावला.
आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दल आणि प्रशासनाला माहिती देण्यात आली. मात्र, येडशीपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या धाराशिवमधून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्यास पहाटेचे चार वाजले, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
आगीची तीव्रता वाढत असताना गावकऱ्यांनी बादल्यांनी पाणी टाकले, बोअरवेल सुरू केले, घरावर चढून आग विझविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर जेसीबीच्या साहाय्याने घराच्या मागील बाजूची भिंत फोडून आत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
अग्निशमन गाडी आली; पण डिझेल आणि पाणी नव्हते?
या दुर्घटनेतील सर्वाधिक धक्कादायक आरोप म्हणजे घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन वाहनात डिझेल संपले होते आणि पाणीही उपलब्ध नव्हते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आग विझविण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाच वाहनात नसतील, तर अशा यंत्रणेचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांकडे धुरामध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक मास्क नव्हते, तसेच संबंधित चार जवानांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे बचावकार्य प्रभावीपणे करता आले नाही, अशी ग्रामस्थांची भावना आहे.
या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे. अग्निशमन वाहनाची स्थिती, इंधन व पाण्याची उपलब्धता, जवानांचे प्रशिक्षण, घटनास्थळी पोहोचण्यास लागलेला वेळ आणि बचावकार्यात झालेला विलंब या सर्व बाबींची तपासणी होणे गरजेचे आहे.
धाराशिवला स्वतःचे अग्निशमन वाहनच नाही?
या घटनेच्या निमित्ताने धाराशिव नगरपालिकेच्या अग्निशमन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धाराशिव नगरपालिकेकडे स्वतःची पुरेशी अग्निशमन वाहने उपलब्ध नसल्याने उमरगा नगरपालिकेच्या वाहनावर अवलंबून राहावे लागत असल्याचा मुद्दा समोर आला आहे.
धाराशिव जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या शहरातच पुरेशी अग्निशमन व्यवस्था नसेल, तर ग्रामीण भागातील आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी पोहोचणार? येडशीसारख्या गावात आग लागल्यानंतर बचावासाठी आवश्यक यंत्रणा वेळेत उपलब्ध होणार नसेल, तर नागरिकांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
आमदार प्रतापसिंह पाटील यांचा संताप
येडशी येथील दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. सहा निष्पाप नागरिकांचा बळी गेलेल्या या घटनेत प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी होणे आवश्यक आहे. अग्निशमन दल वेळेत पोहोचले का, त्यांच्याकडे आवश्यक साधने होती का आणि बचावकार्यामध्ये नेमक्या कोणत्या अडचणी आल्या, याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
ओमराजे निंबाळकर यांची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे लागलेल्या भीषण आगीत सहा निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी धाराशिव नगरपालिकेला तातडीने चार अग्निशमन वाहने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध होण्यासाठी सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तहान लागल्यावर विहीर खोदण्याची वेळ कशाला?
येडशीतील दुर्घटनेने अग्निशमन यंत्रणेतील त्रुटींचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. दुर्घटना घडल्यानंतर वाहने मागविणे, जवानांचे प्रशिक्षण घेणे आणि आवश्यक साधनांची खरेदी करणे यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच सक्षम व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे.
आज सहा जणांचा बळी गेल्यानंतर अग्निशमन दलाच्या व्यवस्थेवर चर्चा सुरू झाली आहे. उद्या दुसऱ्या गावात अशीच दुर्घटना घडली तर पुन्हा हाच प्रश्न उपस्थित होणार का? धाराशिव नगरपालिकेला चार अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रशिक्षित कर्मचारी, पुरेसा इंधनसाठा, पाण्याची उपलब्धता, ऑक्सिजन मास्क आणि आधुनिक बचाव साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
निष्काळजीपणाची चौकशी होणार का?
येडशीतील आगीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी काहींचे प्राण वाचविण्याची संधी होती का, अग्निशमन दलाच्या कथित विलंबामुळे बचावकार्यावर परिणाम झाला का, वाहनात डिझेल आणि पाणी का नव्हते, जवानांकडे आवश्यक प्रशिक्षण व साधने का नव्हती, या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यायला हवीत.
ग्रामस्थांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे केवळ चौकशीचे आश्वासन न देता स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
सहा जणांचे प्राण गेल्यानंतर तरी धाराशिवची अग्निशमन यंत्रणा सक्षम होणार का? की आणखी एखाद्या दुर्घटनेची प्रशासन वाट पाहणार? हा प्रश्न आता धाराशिवकर विचारत आहेत.





