धाराशिव : शहरातील अवैध मटका जुगार अड्ड्यांविरोधात धाराशिव शहर पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवत एकाच सायंकाळी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत कल्याण, मिलन नाईट आणि श्रीदेवी नाईट मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण २ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० ते रात्री ८:१४ वाजेच्या सुमारास धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने हद्दीतील चार ठिकाणी ही छापेमारी केली.
कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे :
१) इंदिरा नगर (सांजा रोड) येथील पहिली कारवाई : सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास सांजा ते धाराशिव येणाऱ्या रोडलगत सुरवे जेन्ट्स पार्लर समोर (इंदिरा नगर) येथे छापा टाकला असता, आरोपी दाऊद कचरु पठाण (वय ४० वर्षे, रा. सोलापूर रोड, धाराशिव) हा ‘कल्याण मटका’ जुगाराचे साहित्य आणि ५०० रुपये रोख रक्कम स्वतःच्या ताब्यात बाळगून जुगार घेताना आढळून आला.
२) इंदिरा नगर (सांजा रोड) येथील दुसरी कारवाई : सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास त्याच परिसरात (सुरवे जेन्ट्स पार्लर समोर, इंदिरा नगर) आरोपी समीर अब्दुल अजीज अरब (वय २६ वर्षे, रा. सांजा ते धाराशिव रोड, इंदिरा नगर, धाराशिव) यास ‘मिलन नाईट मटका’ जुगाराचे साहित्य व ३९० रुपये रोख रकमेसह पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
३) भोगवती नदीकाठ परिसरातील कारवाई : सायंकाळी ७:३५ वाजेच्या सुमारास भोगवती नदीच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडसमोर छापा टाकून आरोपी सर्फराज अलमोद्दीन शेख (वय ३४ वर्षे, रा. सांजा वेस गल्ली, धाराशिव) याच्या ताब्यातून ‘मिलन नाईट मटका’ जुगाराचे साहित्य आणि ७३० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
४) देशपांडे स्टॅण्ड बाजार परिसरातील कारवाई : रात्री ८:१४ वाजेच्या सुमारास देशपांडे स्टॅण्ड बाजारातील एका टपरीसमोर छापा टाकला असता, आरोपी आकाश श्रीकांत काटवटे (वय ३० वर्षे, रा. झोरे गल्ली, धाराशिव) हा ‘श्रीदेवी नाईट मटका’ जुगाराचे साहित्य व ९७० रुपये रोख रक्कम बाळगलेला आढळून आला.
पोलिसांनी चारही ठिकाणांहून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली असून, नमूद चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र ४ गुन्हे नोंदवले आहेत. शहरातील अवैध धंद्यांविरोधातील या कारवाईमुळे मटका बुकींचे धाबे दणाणले असून, पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.



