वाशी : एका ३६ वर्षीय तरुणाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांसह लाकडी काठी आणि कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना वाशी तालुक्यातील दळवेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दळवेवाडी येथील एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दसमेगाव (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील रहिवासी प्रशांत अंकुश मोरे (वय ३६ वर्षे) हे २२ नोव्हेंबर रोजी ०४:०० वाजेच्या सुमारास दळवेवाडी येथील जीआर प्लॉट परिसरात असताना हा प्रकार घडला. यावेळी दळवेवाडी येथील संशयित आरोपी वैष्णव अशोक यादव, अशोक विठ्ठल यादव आणि जयश्री अशोक यादव (सर्व रा. दळवेवाडी, ता. वाशी) यांनी प्रशांत मोरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यानंतर तिन्ही आरोपींनी संगनमत करून प्रशांत मोरे यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने तसेच धारदार कुऱ्हाडीने मारहाण केली. या हल्ल्यात प्रशांत मोरे गंभीर जखमी झाले आहेत.
उपचारानंतर प्रशांत मोरे यांनी त्याच दिवशी (२२ नोव्हेंबर) वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी वैष्णव यादव, अशोक यादव आणि जयश्री यादव या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१) (धोकादायक शस्त्राने गंभीर दुखापत करणे), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.




