धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या पाठोपाठ अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनीही मोठा दणका दिला आहे. शासनास खोटी माहिती देऊन विस्तारित पत्रकार भवनासाठी आकाशवाणीसमोर मिळवलेला ६ गुंठे शासकीय भूखंड शर्तभंग झाल्याने परत शासनाकडे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले होते .या निकालाविरुद्ध संघाचे स्वयंघोषित अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी अप्पर विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली होती. परंतु अप्पर विभागीय आयुक्तांनी देखील रणदिवे यांचे अपील फेटाळले असून, धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या आणि नोंदणीकृत नसलेल्या धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे आंबेडकर पुतळ्याजवळ स्वतःची इमारत असताना आणि सांजा रोडवर २० गुंठे भूखंड असताना, शासनास खोटी माहिती देऊन २००९ मध्ये आकाशवाणी समोर सहा गुंठे भूखंड मिळवलेला होता.त्यानंतर तीन वर्षाच्या आत बांधकाम करावे, असा नियम असताना सर्व अटी आणि शर्तीचा भंग केला होता. या संदर्भात सत्यशोधक तथा आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे दि. २८ ऑगस्ट २०२० रोजी लेखी तक्रार केली होती.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, उप विभागीय अधिकाऱ्यानी तहसिलदार, तहसिलदारांनी मंडल अधिकारी, मंडल अधिकाऱ्याने तलाठी असा पत्र व्यवहार करून अहवाल मागितला होता. तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याने तहसिलदारांकडे, पत्रकार संघाच्या आकाशवाणी समोरील ६ गुंठे शासकीय भूखंडावर १२ वर्षे झाली तरी अद्याप बांधकाम झाले नसल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर तहसिलदारांनी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष धनंजय रणदिवे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असता त्यांनी अजब खुलासा केला होता. दुष्काळ, कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे बांधकाम झाले नसल्याची कबुली त्यांनी दिली होती. त्यानंतर तहसिलदारांनी उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या १२ वर्षांपूर्वी दिलेल्या आकाशवाणी समोरील शासकीय भूखंडावर अद्याप कोणतेही बांधकाम करण्यात आले नसल्याने जमिनीचा शर्तभंग झाला असल्याचे दिसून येते , असा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला होता. हा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघास नोटीस बजावण्यात आली आणि त्याची सुनावणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या न्यायालयात झाली. शर्तभंग झाल्याने आकाशवाणीसमोरील ६ गुंठे भूखंड परत शासनाकडे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी निर्गमित केले आहेत.
अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांचा दणका
तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या या निकालाविरुद्ध उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे स्वयंघोषित अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. यावेळी खंडपीठाने सुनावणीसाठी १२ लाख रुपये डिपॉझिट जमा करण्याचा आदेश दिला असता रणदिवे यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आणि त्यांनी १२ लाख कोर्टात जमा न करता अप्पर विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केले, पण तक्रारदार बाळासाहेब सुभेदार यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल असल्याचे अप्पर विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देताच, कोणताही निकाल न देता ही याचिका निकाली काढण्यात आली. त्यानंतर रणदिवे यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात १२ लाख भरले. त्याची सुनावणी होऊन खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी अप्पर विभागीय आयुक्तानी घेण्याचा आदेश काढला, त्यानंतर अप्पर विभागीय आयुक्तासमोर सुनावणी झाली अप्पर विभागीय आयुक्तानी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत रणदिवे यांचे अपील फेटाळून लावले. त्यामुळे धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघास मोठा दणका बसला आहे. कोर्टात पत्रकार संघाचे १२ लाख अडकले असून संघाचे स्वयंघोषित अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हाती धुपाटणे आले आहे.
सांजा रोडवरील भूखंड विकण्याचा घाट हाणून पाडला
यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या तीन पदाधिकऱ्यानी संगनमत करून सांजा रोडवरील २० गुंठे भूखंड विकण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांनी हाणून पाडला होता. सांजा रोडवरील भूखंडावरही २० वर्षे झाली तरी बांधकाम नसल्याने आणि हा भूखंड शासनाच्या पैश्यातून खरेदी करण्यात आल्याने हा भूखंड शासनाने परत घ्यावा, अशी मागणी पत्रकार सुनील ढेपे आणि बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे , त्याची देखील महाराष्ट्र शासनाने दखल घेत हा भूखंड विक्रीस मनाई केली आहे, तसेच हा भूखंड शासनजमा करण्याच्या हालचालीं सुरु आहेत.
पत्रकार भवनचे पीआर कार्ड रद्द
भारत गजेंद्रगडकर अध्यक्ष असताना सन १९८८ – ८९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ( स्टेडियम जवळ ) एक गुंठा जागा नगर परिषदेकडून मिळाली होती. त्या जागेवर गजेंद्रगडकर अध्यक्ष असतानाच इमारत बांधण्यात आली आहे. पण मुळात पत्रकार भवन आणि आसपासची ३३ गुंठे जागा बेंबळीचे दिवंगत माजी आमदार आर.के. माने यांच्या नवजीवन शिक्षण संस्थेच्या मालकीची आहे, नगर परिषदेने फेरफार करून ही जागा पत्रकार संघ , काही खासगी व्यक्तीना दिली होती तसेच काही दुकाने बांधून भाड्याने दिली आहेत. त्याविरुद्ध नवजीवन शिक्षण संस्थेने मंत्रालयात अपील केले होते. या अपिलाचा अंतिम निकाल नवजीवन शिक्षण संस्थेच्या बाजूने लागला असून, जागेचे पीआर कार्ड देखील संस्थेच्या नावावर झाले आहे.
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची न्यास नोंदणी नाही. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी हा संघ संलग्न होता, पण परिषदेवर देखील गेली अनेक वर्षे प्रशासक आहे, तसेच उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाने परिषदेचे कोणतेही नियम न पाळता नेहमीच कोलदांडा मारला आहे. दरम्यान सत्यशोधक तथा आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या तक्रारीवरून आकाशवाणी जवळील सहा गुंठे जागा शासन जमा झाली आहे. तसेच सांजा रोडवरील २० गुंठे जागेचा वादही महसूल मंत्र्याच्या कोर्टात चालू असून, त्याची सुनावणी सुरु आहे. दुसरीकडे आहे तर पत्रकार भवनही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.