धाराशिव – मोक्का गुन्ह्यातील तडीपार आरोपी आणि त्याचे चार साथीदार धाराशिव जिल्ह्यात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पैकी तीन आरोपी जेरबंद झाले तर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
पुणे जिल्ह्यातील मोक्का टोळीचा प्रमुख विनोद शिवाजी जामदरे वय ३५ वर्षे हा त्याचे इतर ४ साथीदारांसह येरमाळा पोलीस ठाणे हद्दीमध्ये शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनिय माहीती स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांना काल दि. २०.५.२०२४ रोजी रात्री २३.०० वा. च्या सुमारास मिळाली होती. सदर माहीतीच्या आधारे ]पोलीस पथक येरमाळा परीसरात रात्रगस्तीसाठी रवाना झाले होते.
रात्रगस्त करत असताना आज दि. २१.५.२०२४ रोजी ०१.५० वा. च्या सुमारास चोराखळी शिवार, धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील कामत हॉटेलजवळ आलो असता सदर ठिकाणी ५ इसम संशयीत अवस्थेत दिसले. त्यांना विचारपुस करण्यासाठी त्यांच्याकडे जात असताना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते अंधाराचा फायदा घेऊन पळुन जाउ लागले. त्यांचा पाठलाग करुन ५ पैकी ३ इसमाना ताब्यात घेतले. २ इसम तेथुन पळुन गेले. घटनास्थळावर बारकाईने पाहणी केली असता तेथे एका गावठी पिस्टलचे मॅगझीन मिळुन आले. तसेच नमुद ३ इसमांच्या हातामध्ये एक कत्ती व एक कटावणी मिळुन आली. यावरुन सदरचे इसम हे शस्त्रासह दरोडा टाकण्यासाठी आलेले असल्याची खात्री झाली.
सदर इसमांना विश्वासात घेऊन अधिक विचारपुस केली असता त्यांची नावे 1) विनोद शिवाजी जामदारे वय 35 वर्ष, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, जाधव नगर, पुणे. मुळ गाव –लोणारवाडी, ता परंडा, जि. धाराशिव 2) बाबासाहेब व्यंकट भायगुडे वय 25 वर्ष, साईनगर, कोराड वस्ती, हिंगणीपूर, पुणे. मुळ गाव – वाटेफळ, ता परंडा, जि. धाराशिव 3) गणेश दिलीप मस्कर वय 25 वर्ष रा. स्वारगेट, पुणे अशी सांगितली. पळुन गेलेल्या २ इसमांची नावे ४) आकाश सुभाष गाडे वय २७ वर्षे, रा. सिंहगड रोड, माणिक बाग, रामनगर, पुणे ५) समाधान आगलावे, वय २५ वर्षे, रा. माणकेश्वर, ता. परांडा, जि. धाराशिव अशी सांगितली.
नमुद इसमांचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता आरोपी विनोद जामदारे याच्याविरुध्द सिंहगड पोस्टे येथे मोक्का, दरोडा, खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म एक्ट, जबरी चोरी, धमकी देणे असे १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातुन २ वर्षाकरीता हद्दपार केलेले असुन दिनांक ८.५.२०२४ पासुन तो आंबी पोलीस ठाणे, धाराशिवच्या हद्दीमध्ये राहवयास आहे असे अभिलेखावरुन दिसुन येते. तसेच आरोपी गणेश दिलीप म्हसकर व आकाश सुभाष गाडे यांच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे ६ गुन्हे पुणे येथे दाखल आहेत असे अभिलेखावरुन दिसुन येते.
पळुन गेलेल्या २ इसमांबाबत अधिक माहिती घेतली असता आरोपी आकाश गाडे याच्या हातामध्ये गावठी पिस्टल होते. पिस्टल हाताळत असताना मॅगझीन घटनास्थळी पडली आणि सदरचा आरोपी आकाश गाडे हा पिस्टल घेऊन पळुन गेला होता. सदर इसमास बार्शी पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी बार्शी परीसरामध्ये मॅगझीन नसलेल्या पिस्टलसह पकडले असल्याची खात्रीलायक माहीती मीळाली आहे.
ताब्यात घेतलेल्या नमुद ३ आरोपीतांना त्यांच्याकडे मिळालेल्या कत्ती, कटावणी व मॅगझीन या शस्त्रांसह येरमाळा पोस्टेच्या ताब्यात दिले असुन त्यांच्याविरुध्द व पळुन गेलेले २ आरोपी असे एकुण ५ आरोपीविरुद्ध येरमाळा पोस्टे येथे गु.र.नं. १३८/२४ कलम ३९९, ४०२ भा.दं.वि. सह ३, २५ भा.ह.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास चालु आहे.