धाराशिव – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या ( मंगळवारी ) सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. धाराशिव मतदारसंघाची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. धाराशिवमधून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर ( शिवसेना ( उबाठा ) पुन्हा बाजी मारणार की , आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील प्रथमच निवडून येणार , याबाबत प्रचंड औत्सुक्य आहे.
लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात ७ मे रोजी निवडणूक पार पडली होती. एकूण मतदान सरासरी 63.88 टक्के झाले होते. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. आता एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मतमोजणी ४ जून होणार आहे. मतमोजणीला अवघे तीन दिवस उरले असताना दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.या मतदारसंघात एकूण 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. पण विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि सौ. अर्चनाताई पाटील या दीर – भावजयमध्ये खरा सामना आहे.
*सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात
* मतमोजणी केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध
* विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार मतमोजणी
* सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची होणार मोजणी
* 500 पोलीस कर्मचारी – अधिकाऱ्यांचा सुरक्षा बंदोबस्त
* 1200 अधिकारी-कर्मचारी करणार मतमोजणी
शासकीय तंत्रनिकेतन येथील स्ट्रॉंग रूम अर्थात सुरक्षा कक्षात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या असून या स्ट्रॉंग रूमचे सील सकाळी 6.30 वाजता उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे.टपाली मतपत्रिका ह्या कोषागार कार्यालयातील स्ट्रॉंग रूम येथे ठेवण्यात आल्या असून 4 जून रोजी सकाळी 6 वाजता ह्या टपाली मतपत्रिका शासकीय तंत्रनिकेतन येथील मतमोजणी केंद्रावर घेऊन जाण्यात येणार आहे. 3979 दिव्यांग मतदार आणि 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक,भारतीय सैन्यात कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील 1810 भारतीय सैनिकांनी आणि सुविधा केंद्रात मतदान केलेल्या 3442 मतदारांचे असे एकूण 9231 मतदारांच्या टपाली मतपत्रिकांची मोजणी सकाळी 8 वाजता सुरू करण्यात येणार आहे. सकाळीच 8.30 वाजता मतदान यंत्राद्वारे करण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
औसा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी हॉल क्रमांक 119 मध्ये 14 टेबलवर होणार असून मतमोजणीच्या 22 फेऱ्या,उमरगा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी हॉल क्रमांक 111 मध्ये 14 टेबलवर 23 फेऱ्यांमध्ये, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची मतमोजणी हॉल क्रमांक 208 मध्ये 14 टेबलवर 29 फेऱ्यांमध्ये, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील मतांची मतमोजणी हॉल क्रमांक 203 मध्ये 14 टेबलवर 30 फेऱ्यांमध्ये,परंडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी हॉल क्रमांक 206 मध्ये 14 टेबलवर 27 फेऱ्यांमध्ये आणि बार्शी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी हॉल क्रमांक 209 मध्ये 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये होणार आहे. टपाली मतपत्रिकेची मतमोजणी हॉल क्रमांक 124 आणि 127 मध्ये होणार असून या हॉलमध्ये प्रत्येकी 8 टेबलवर आणि भारतीय सैन्यातील कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील भारतीय जवानांच्या मतदानाची मतमोजणी हॉल क्रमांक 102 मध्ये सहा टेबलवर होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर अंतरापासून मतमोजणी केंद्रावर पायी चालत यावे लागणारआहे.मतमोजणी केंद्रावर वाहन पार्किंगची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर उमेदवार प्रतिनिधींना मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध राहणार आहे.मतमोजणी केंद्रावर सशुल्क भोजन व्यवस्था राहणार आहे.मतमोजणीसाठी जवळपास 1500 अधिकारी – कर्मचारी असतील. विधानसभा मतदारसंघनिहाय 6 सभागृहात मतमोजणीचे काम 1200 अधिकारी कर्मचारी करणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतन येथे 6 मोठे सभागृह असल्यामुळे मतमोजणीची अतिशय चांगली व्यवस्था उपलब्ध आहे.ईव्हीएम मशीन ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत तेथून ते मतमोजणी कक्षापर्यंत सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे.मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी मतमोजणी करून ती एक्सेल शीट तसेच मॅन्युअलमध्ये करून खात्री करूनच encore अँपवर अपलोड करतील.ही माहिती थेट eci.gov.in या आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
प्रत्येक फेरीनिहाय निकाल : धाराशिव लाइव्ह वेबसाईटवर पाहता येणार
धाराशिव मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनचे निकाल : धाराशिव लाइव्ह वेबसाईटवर पाहता येणार आहे. त्यासाठी खालील लिंक ओपन करून ठेवावी… www.dharashivlive.com