मुंबई – विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न झाली. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत 274 आमदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घेतला. मतमोजणीच्या निकालानुसार, महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे.
भाजपच्या 5 उमेदवारांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी 2 उमेदवारांनी यश मिळवले.
महाविकास आघाडीच्या काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराने विजयी ठरले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.
विजयी उमेदवारांची नावे:
- भाजप: पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे
- शिवसेना (शिंदे गट): भावना गवळी, कृपाल तुमाणे
- NCP (अजित पवार): राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
- काँग्रेस: प्रज्ञा सातव
- शिवसेना (ठाकरे): मिलिंद नार्वेकर
जाणून घ्या कोण किती मतांनी विजयी-
उमेदवार/पक्ष किती मतांनी विजयी अमित गोरखे (भाजपा) 26 पंकजा मुंडे (भाजपा) 26 परिणय फुके (भाजपा) 26 योगेश टिळेकर (भाजपा) 26 राजेश विटेकर (NCP-अजित गट) 23 शिवाजीराव गर्जे (NCP-अजित गट) 24 भावना गवळी (शिवसेना शिंदे) 24 कृपाल तुमाने (शिवसेना शिंदे) 24 प्रज्ञा सातव (काँग्रेस) 25 मिलिंद नार्वेकर (शिवसेना-UBT) 23 जयंत पाटील (शेकाप- NCP शरद पवार) पराभूत विधानपरिषद निकालाची वैशिष्ट्ये
- काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली
- दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा
- शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही
- उद्धव ठाकरेंना शिंदे यांचं एकही मत फोडता आलं नाही
- भाजपचे तरूण चेहरे विधानपरिषदेत दिसणार
- पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन
- अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत
- योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व
- सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार
निकालाचा मॅजिक पॅटर्न
देवेंद्र फडणवीसांनी 2022 च्या धक्कादायक निकालांचा मॅजिक पॅटर्न पुन्हा एकदा खरा करून दाखवला. 2022 ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज फडणवीसांनी विजयी हॅट्रिक केली. महत्त्वाचं म्हणजे सलग 5 टर्म आमदार असणारे शेकापचे जयंत पाटील जे शरद पवार पुरस्कृत उमेदवार होते, त्यांनाही महायुती आणि फडणवीसांनी धोबीपछाड दिली.