धाराशिव – आज केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.तुळजापूर रेल्वे मार्गासाठी २२५ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार पाटील यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना सांगितले की, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध सुविधांची घोषणा केली आहे. महिलांच्या विकासासाठी ३ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर ग्रामीण विकासासाठी २.६६ लाख कोटींची तरतूद केली आहे. रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित पाच योजनांसाठी दोन लाख कोटींची तरतूद केली असून, याचा लाभ ४ कोटी युवकांना होईल.
आमदार पाटील यांनी सांगितले की, पाणी, वीज, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांसाठी ११ लाख ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा रोडमॅप असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेषत: धाराशिव – तुळजापूर रेल्वे मार्गासाठी २२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हे तुळजापूरवासीयांसाठी अत्यंत समाधानकारक आहे, कारण यामुळे आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र लवकरच रेल्वेच्या नकाशावर येईल.