धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लाचखोरी प्रकरणी एसीबी (अँटी करप्शन ब्यूरो) पथकाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी, डॉ. नितीन कालिदास गुंड (वय 32), हे या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्याचा आरोप आहे.
तक्रारदार, 27 वर्षीय पुरुष, मसला खुर्द येथे सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पदावर कार्यरत आहे. त्यांना दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल न पाठवण्यासाठी डॉ. गुंड यांनी 3000 रुपये लाच मागितली होती. लाच मागणीच्या पडताळणीदरम्यान, 24 जुलै रोजी डॉ. गुंड यांनी पंचांच्या उपस्थितीत ही रक्कम स्वीकारली, त्यामुळे त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
यातील तक्रारदार हे कंत्राटी पदावर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून मसला खुर्द येथे सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नोकरीस आहेत. त्यांचे पगार , वैद्यकीय रजा, किरकोळ रजा व इतर अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याचे अधिकार यातील आलोसे डॉ. नितीन गुंड वैद्यकीय अधिकारी यांना आहेत. यातील आलोसे यांनी यातील तक्रारदार यांची दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी व सदर रजेचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न पाठविण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 3000/- रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून 3000/- रु लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस उप-अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी पथकाने यशस्वीपणे सापळा रचला आणि आरोपीला अटक केली.पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अंमलदार इप्तेकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके व चालक दत्तात्रय करडे यांनी हा सापळा रचला होता. डॉ. गुंड यांच्या विरोधात तामलवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव पोलीस प्रशासनाने नागरिकांना सूचित केले आहे की, सरकारी अधिकारी किंवा खासगी व्यक्ती कोणत्याही कायदेशीर कामासाठी लाच मागत असल्यास त्वरित संपर्क साधावा. तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक 1064 उपलब्ध आहे.