अणदूर – तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शेतकरी संतोष तुकाराम मोकाशे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची काही मेंढपाळांनी जाणीवपूर्वक नासधूस केल्याची घटना घडली आहे. दत्ता रामा गळाकाटे आणि रमेश शरणापा सोनटक्के अशी या आरोपी मेंढपाळांची नावे आहेत.
मोकाशे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांच्या शेतात मेंढरं सोडून सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. या घटनेमुळे मोकाशे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी मोकाशे यांनी नळदुर्ग पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. मात्र, आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आरोपी मेंढपाळ हे नेहमीच गुंडगिरी करून शेतकऱ्यांचे नुकसान करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. आरोपी दत्ता रामा गळाकाटे यांच्यावर तर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.