धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत -चेन्नई ग्रीन कॉरिडोर महामार्गावर वैराग (ता. बार्शी) आणि तामळवाडी (ता. तुळजापूर) येथे पर रोड द्वारे कनेक्टिव्हिटी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या भेटीदरम्यान ही माहिती दिली.
सुरत -चेन्नई ग्रीन कॉरिडोर महामार्ग सहा पदरी असून जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय आणि शेतीमालाला चेन्नई व सुरत सारख्या मोठ्या बाजारपेठांशी जोडण्यासाठी महत्वाचा आहे. परंतु, धाराशिव शहराला या महामार्गाशी थेट जोडलेले नसल्याने पर कनेक्टिव्हिटीची आवश्यकता होती.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या विषयावर पत्रव्यवहार करून आज प्रत्यक्ष भेट घेऊन नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी गडकरी यांनी मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.