परंडा – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी आरोप केला की, राज्यात सत्ता आल्यास पवार ओबीसी जात जनगणनेची अमंलबजावणी होईपर्यंत ओबीसी समाजाचे आरक्षण स्थगित करण्याचा विचार करत आहेत.
परंडा येथे रविवारी (दि.२०) आरक्षण बचाव यात्रा आल्यानंतर आंबेडकर यांनी आयोजित सभेत हे विधान केले. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या रेखाताई ठाकूर, मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, ओबीसी नेते रमेश बारसकर, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हा सदस्य तानाजी बनसोडे, प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे आदींसह ओबीसी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आंबेडकर यांचा धनगर समाजाने काठी व घोंगडी देऊन सत्कार केला.
आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाला ५० टक्के उमेदवारी देणाऱ्या पक्षाला पाठींबा देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या मते, १०० ओबीसी समाजाचे प्रतिनिधी निवडून आल्यासच ओबीसींचे आरक्षण टिकेल. त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चा नौटंकी असल्याचे म्हटले.
आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करण्याचा आरोप केला. विद्यापीठ नामांतराचा मुद्दा उकरून काढण्याचा आरोपही त्यांनी केला. राजकीय पक्षांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु जातीय रंग देऊन ते ताणू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. ओबीसी समाजाचे घटनात्मक आरक्षण वाचविण्यासाठी विधानसभेत ओबीसी समाजाचे प्रतिनिधी निवडून येणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.