पक्या: (हातातला पेपर वाचत) “अरे भावड्या, धाराशिवमध्ये किती राजकीय वातावरण तापलंय बघ! यंदा निवडणूक फारच चुरशीची होईल असं वाटतंय.”
भावड्या: (हसत) “हो रे पक्या, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळेच रिंगणात उतरलेत. मागच्या वेळेस कैलास पाटील जिंकले होते, पण आता बघू काय होतंय!”
पक्या: “महायुतीत काय चाललंय, त्यात काही फुट पडली की काय?”
भावड्या: “तेच तर बघायचंय! महायुतीत तुटली तर सगळं समीकरण बदलू शकतं. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा एक कार्यकर्ता शिंदे गटात जाणार असं म्हणतायत. ह्या सगळ्याने नक्की कोणाला उमेदवारी मिळणार?”
पक्या: “भाजपकडून नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, अजित पिंगळे, मल्हार पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर शिंदे गटाकडून तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत, नितीन लांडगे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून सुरेश पाटील.”
भावड्या: “हं, म्हणजे एकूणच मोठा घोळ आहे. पण आपल्याला काय, आपण आपल्या कामात खुश! काय म्हणतोस पक्या, कोण जिंकणार यंदा?”
पक्या: (हसत) “ते तर निवडणुकीनंतरच कळेल! पण एक मात्र नक्की, यंदा धाराशिवमध्ये चांगलाच धुरळा उडणार!”
भावड्या: “होय, बघू कोण बाजी मारतोय. आत्ता तरी सगळेच जोरात आहेत!”
( “गोफणगुंडा” सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )