उमरगा – विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागल्यामुळे उमरगा -लोहारा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे, त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ज्ञानराज चौगुले यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष वेधले जात आहे.
मागील तीन विधानसभा निवडणुकीत शिवसेना अखंड होती. त्यामुळे शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅटट्रिक मारले होते. सन २००९, २०१४, आणि २०१९ च्या निवडणुकीत विजय संपादन करणाऱ्या ज्ञानराज चौगुले यांचा चौथ्यांदा विजय होणार का याकडे लक्ष वेधले जात आहे.
यंदाच्या निवडणुकीत राजकीय चित्र बदलले आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ज्ञानराज चौगुले हे एकनाथ शिंदे गटात गेले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे राजकीय गुरु माजी खासदार रवींद्र गायकवाड हे देखील एकनाथ शिंदे गटात सामील झाले.
हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता, पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून ज्ञानराज चौगुले यांना उमेदवारी मिळणार असली तरी शिवसेना ठाकरे गटाकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वाटणीत काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून दर वेळी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाते, पण ज्ञानराज चौगुले यांनी बाजी मारली आहे. यंदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील भाजपमध्ये प्रवेश केल्याने ज्ञानराज चौगुले यांचा मार्ग सोपा झाला आहे. काँग्रेसला मात्र यंदाही नव्या चेहऱ्याला उभे करून ज्ञानराज चौगुले यांना टक्कर द्यावी लागणार आहे.